
कॅनडा सरकारने सोमवारी लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. हा निर्णय कॅनडातील हिंदुस्थानी वंशाच्या लोकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. कॅनडाच्या सार्वजनिक सुरक्षामंत्र्यांच्या विभागाने (Public Safety Canada) जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की, या गँगने खून, गोळीबार आणि खंडणी मागणी सारखे गंभीर गुन्हे केले आहेत, ज्यामुळे हिंदुस्थानी वंशाच्या समुदायात भीती पसरली आहे.
कॅनडामधील सरकारने म्हटले आहे की, या निर्णयामुळे केवळ गुन्हेगारीला आळा बसणार नाही तर हिंदुस्थानी वंशाच्या लोकांना सुरक्षिततेची भावना देखील मिळेल. सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी अनंदसंगरी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “कॅनडामध्ये हिंसाचार आणि दहशतवादाला स्थान नाही, विशेषतः जेव्हा विशिष्ट समुदायांना भीती आणि दहशतीच्या वातावरणात जगण्यास भाग पाडले जात आहे.”
दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई गँगवर कॅनडामध्ये हिंदुस्थानी वंशाच्या लोकांवर हल्ले करणे, खंडणी मागणे यासह अनेक आरोप आहेत. याच पाश्ववभूमीवर आता हा निर्णय घेण्यात आला आहे, असं बोललं जात आहे.






























































