दोन हजार एलईडी पैकी अनेक बंद, ठेकेदार नॉट रीचेबल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमित खोत । मालवण

मालवण नगरपालिकेने राज्यशासनाच्या वैशिष्टपूर्ण योजनेतून सुमारे सव्वा कोटी किमतीचे दोन हजार एलईडी स्ट्रीट लाईट वर्षभरापूर्वी शहरात बसवले. ऊर्जा बचत करून सर्व शहर प्रकाशमान व्हावे हा या योजनेतील महत्वाचा उद्देश होता. मात्र बसवण्यात आलेले एलईडी दिवे वारंवार नादुरुस्त बनत असल्याने मालवण शहरात दिव्याखाली अंधार असे चित्र निर्माण झाले आहे.

दरम्यान ज्या ठेकेदार कंपनीने हे एलईडी दिवे बसवले त्यांनी दिव्यांची दुरुस्ती व देखभाल पाच वर्षे करणे अपेक्षित होते. मात्र ६० टक्के बिल रक्कम घेऊन ठेकेदार पसार झाल्याने पालिका प्रशासन व नगरसेवकानाच खाजगी कर्मचारी घेऊन दिवे दुरुस्त करण्याची नामुष्की ओढवली आहे.

शहरातील सुमारे दोन हजार वीज खांबांवर हे एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. त्यापैकी अनेक मार्गावरील दिवे सतत बंद स्थितीत असल्याने नागरिक संतप्त बनले आहेत. दोन हजार दिवे बसवल्या नंतरही शहरातील रस्त्यावर अंधारच निर्माण होणार असेल तर खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांचे काय? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

ठेकेदार कंपनी पसार
मालवण शहरात ज्या ठेकेदार कंपनीस एलईडी दिवे बसवण्याचा ठेका देण्यात आला त्यांनी सहा महिने कालावधीत सुमारे दोन हजार एलईडी दिवे वीज खांबांवर बसवले. त्या नंतर सुरवातीला ३० लाख व नंतर ४० लाख अशी रक्कम पालिकेने ठेकेदारास दिलीही. मात्र त्यानंतर ठेकेदार पसार झाला. नादुरुस्त एलईडी तक्रार घेण्यासही कर्मचारी नियुक्त ना अथवा दुरुस्ती कर्मचारीही नियुक्त नाही अशी स्थिती निर्माण झाली.

नगरसेवकाना लागली ड्युटी
एलईडी दिवे बंद असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र दिवे दुरुस्ती बाबत कोणतीही अधिकृत यंत्रणा नसल्याने खाजगी स्वरूपात कर्मचारी बोलावून प्रभागातील नादुरुस्त दिव्यांची दुरुस्ती करावी लागत आहे. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

ठेकेदारावर कारवाईची प्रक्रिया सुरू – नगराध्यक्ष
ठेकेदार कंपनीने मालवण पालिकेची फसवणूक केली आहे. करारातील अटी व नियमांची पूर्तता केली नाही. ठेकेदार नॉट रीचेबल असून पसार झाला आहे. त्याबाबत कायदेशीर सल्ला घेत ठेकेदारावर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली. तर बंद स्ट्रीट लाईटमुळे नागरिकांना समस्या निर्माण होऊ नये यासाठी दुरुस्ती यंत्रणा उभारली जात असल्याचेही नगराध्यक्ष यांनी स्पष्ट केले.

हायमास्ट टॉवरचे दिवेही बंदच
मालवण शहरातील गजबजलेले मार्ग अधिक उजळून निघावे यासाठी अनेक ठिकाणी लाखो रुपये किमतीचे हायमास्ट दिवे बसवण्यात आले. मात्र यातील काही दिवे सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून बंद असून हायमास्ट खाली अंधार पसरला आहे. याबाबत पालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही कार्यवाही होत नसेल तर हे हायमास्ट दिवे शोभेसाठी लावले आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.