
लोकशाहीर विठ्ठल उमप आणि लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचा संगीतमय वारसा पुढे नेण्याचे काम त्यांचे पुत्र करत आहेत. दोन्ही लोकशाहिरांनी कोळीगीतं, भक्तिगीतं, लोकगीतं, कव्वाली अशा वैविध्यपूर्ण गीतांनी अवघ्या महाराष्ट्राला डोलवले. तोच आवाज… तो अंदाज येऊन संदेश विठ्ठल उमप आणि चंद्रकांत प्रल्हाद शिंदे पुन्हा प्रेक्षकांसमोर आले आहेत. त्यांनी ‘ पुन्हा विठ्ठल पुन्हा प्रल्हाद’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
‘पुन्हा विठ्ठल पुन्हा प्रल्हाद’ या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन संदेश उमप यांचे आहे. विठ्ठल उमप यांची गाणी त्यांचा मुलगा संदेश उमप तर प्रल्हाद शिंदे यांची गाणी त्यांचा मुलगा चंद्रकांत शिंदे सादर करतात. नुसती गाणीच नव्हे तर त्या गाण्यांमागील कहाणी आणि आठवणी सांगितल्या जातात. विठ्ठल उमप यांची ‘आज आम्ही नमिला पुत्र गौरीचा ही गण, ‘गोरोबाच्या हाती मातीचा चिखल’ हा उमप यांनी लिहिलेला अभंग, ‘फू बाई फू फुगडी फू’ भारुड, ‘लग्नाला चला तुम्ही लग्नाला’ हे लोकगीत, ‘दस्तुर मोहबत का’ ही कव्वाली, याशिवाय ‘ये दादा आवर ये’सारखी कोळीगीतं आणि जोगवा, गोंधळ गीतं सादर केली जातात, तर प्रल्हाद शिंदे यांची अत्यंत लोकप्रिय अशी गीते चंद्रकांत शिंदे गातात. यामध्ये ‘ऐका सत्यनारायणाची कथा’, ‘तू सुखकर्ता तू दुखहर्ता’, ‘पाऊले चालती पंढरीची वाट’, ‘चल गं सखे पंढरीला’, ‘विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत’ अशी अनेक गाणी आणि त्यांच्या आठवणी मंचावर सादर होतात. कार्यक्रमाचे निवेदन पराग चौधरी, तर संगीत संयोजन संजय गायकवाड यांचे आहे.
दोन वर्षांपूर्वी ‘पुन्हा विठ्ठल पुन्हा प्रल्हाद’ या कार्यक्रमाचे पाच-सहा कार्यक्रम झाले होते. लॉकडाऊननंतर आता पुन्हा कार्यक्रम सुरू होत आहेत. लॉकडाऊननंतर पहिला प्रयोग 11 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात होणार आहे.
मधुकर पाठक यांना मानवंदना
एचएमव्हीचे ज्येष्ठ संगीतकार मधुकर पाठक यांनी ब्रेक दिला नसता तर प्रल्हाद शिंदे आणि विठ्ठल उमप नावारूपाला आले नसते. मधुकर पाठक यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमात पाठक यांनीच संगीतबद्ध केलेली गाणी सादर करतो. ‘पुन्हा विठ्ठल पुन्हा प्रल्हाद’ या कार्यक्रमातून एका उपेक्षित संगीतकाराला मानवंदना देण्याचा प्रयत्न आहे, असे संदेश उमप यांनी सांगितले.


























































