
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवर राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी 12 जणांची शिफारस केली होती. त्यांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती. त्या यादीवर अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. ती यादी राज्यपालांनी स्वत:कडेच ठेवली असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
अनिल गलगली यांनी गेल्या 22 एप्रिल रोजी माहिती अधिकारात या यादीच्या सद्यस्थितीची माहिती राज्यपाल सचिवालयाकडे मागितली होती. ती यादी जन माहिती अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याने आपणास ती देता येत नाही असे त्यांना 19 मे रोजी अवर सचिव जयराज चौधरी यांनी कळवले होते. गलगली यांनी त्यावर अपील दाखल केले होते. त्याची सुनावणी राज्यपालांच्या उपसचिव प्राची जांभेकर यांनी आज घेतली.
सुनावणीवेळी गलगली यांनी सदस्यांची ती यादी नेमकी कोणाकडे उपलब्ध आहे याबद्दल माहिती विचारली. त्यावर जांभेकर यांनी राज्यपालांकडे यादीसहित संपूर्ण नस्ती आहे आणि त्यावर निर्णय झाल्यावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. तसेच सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माहिती द्यावी की नाही यासंदर्भात सल्लामसलत केली जाईल असेही त्या म्हणाल्याचे गलगली यांनी सांगितले.


























































