जीर्णनगर जुन्नर

>>डॉ. मंजिरी भालेराव

जुन्नरचा प्राचीन संदर्भ हा तेथे असलेल्या लेण्यांतील शिलालेखात शोधावा लागतो, पण तरीही तो तिथे काही मिळत नाही. या परिसरात एकूण 200 च्या आसपास कोरीव लेणी आहेत. हा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानातील सर्वात मोठा लेणीसमूह आहे. इ.स.पूर्व २ऱ्या-1ल्या शतकापासून ते इ.स.च्या 2ऱया-3ऱया शतकापर्यंत इथे लेणी कोरल्या गेलेल्या दिसतात. जीर्ण किंवा जुने असलेले हे जुन्नर महाराष्ट्राच्या एक वैभवशाली काळाची साक्ष देत आजही उभे आहे.

जुन्नर म्हणजे जुने नगर, पण या नगराचे मूळ नाव काय होते हे अजूनपर्यंत आपल्याला समजले नाही, हे आपण मागच्या लेखात पाहिले. जुन्नरचा प्राचीन संदर्भ हा तेथे असलेल्या लेण्यांतील शिलालेखात शोधावा लागतो, पण तरीही तो तिथे काही मिळत नाही. या परिसरात एकूण 200 च्या आसपास कोरीव लेणी आहेत. हा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानातील सर्वात मोठा लेणीसमूह आहे. इ.स.पूर्व 2ऱया-1ल्या शतकापासून ते इ.स.च्या 2ऱया-3ऱया शतकापर्यंत इथे लेणी कोरल्या गेलेल्या दिसतात. हिंदुस्थानातील बौद्ध लयनस्थापत्याच्या विकासातील काही महत्त्वाचे टप्पे आपल्याला जुन्नर येथील लेण्यांमध्ये पाहावयास मिळतात. या लेण्यांमध्ये अनेक दानलेख ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषा यामध्ये कोरलेले आहेत. त्यामधून तत्कालीन इतिहासाच्या पुनर्रचनेसाठी पुष्कळ मदत होते. या लेण्यांमधील विकासाचे आणि अनुषंगिक सर्वांगीण अभ्यास हा कै. सुरेश वसंत जाधव यांनी केला होता. येथील काही टेकडय़ांमधील लेण्यांत जाणे अतिशय अवघड आहे, पण तिथेही डॉ. सुरेश वसंत जाधव दोराच्या सहाय्याने गिर्यारोहण करत गेले होते. लेणी संशोधनाची ही परंपरा सध्या जुन्नरमधील रमेश खरमाळे आणि त्यांच्या इतिहास अभ्यासक मित्रांनी शिरोली जवळच्या दुधाऱया डोंगरात शोधलेल्या लेण्यांच्या रूपात अजून सुरू आहे.

जुन्नरमधील लेण्यांचे एक वैशिष्टय़ म्हणजे इथे असलेला परदेशी दानकर्त्यांचा वावर. मुंबईहून व्यापारी आणि प्रवासी नाणेघाटातून देशावर येत असत. त्यामध्ये काही परकीय प्रवासी, व्यापारी, बौद्ध भिक्षू हे सगळे एकत्र प्रवास करत. बौद्ध भिक्षूंच्या उपदेशामुळे अनेकदा व्यापारी बौद्ध लेण्यांना दाने देण्यास उद्युक्त होत. अशा प्रकारे त्यांनी दिलेली दाने त्यांनी शिलालेखांच्या स्वरूपात नोंदवलेली पाहायला मिळतात. त्यामधून त्यांची नावे, गावाचे नाव, व्यवसाय तर काही वेळेस काय दान दिले आहे तेही दिलेले आढळते. जेव्हा परदेशी लोक दान देत असत तेव्हा ते आपल्या नावाबरोबर यवन किंवा शक असे विशेषण लावाट असत. त्यामुळे ते स्थानिक नाहीत हे लक्षात येते. असे बरेच परदेशी लोक पश्चिम महाराष्ट्रात इ.स.च्या पहिल्या शतकानंतर आले असे कार्ले, नाशिक, जुन्नर, कान्हेरी इथे असलेल्या लेण्यांतील शिलालेखावरून लक्षात येते. अनेकदा त्यांनी दान दिलेल्या लेण्यांतील सजावटीत अशी काही चिन्हे किंवा प्रतीके दिसतात की, ती बघून ती मूळ हिंदुस्थानी परंपरेतील नाहीत हे लक्षात येते. त्या चिन्हांना परदेशीसंदर्भात काही अर्थ असावेत असेही वाटते. बहुदा ती त्यांची शुभचिन्हे किंवा त्या वस्तूचे रक्षण करणारी चिन्हे असावीत. अशी काही चिन्हे जुन्नर येथील लेण्याद्री तसेच त्याच्या मागच्या अर्धवट कोरलेल्या बल्लाळवाडी जवळच्या (सुलेमान) टेकडी या ठिकाणी असलेल्या लेण्यांत पाहावयास मिळतात.

मानमोडी डोंगर, शिवनेरी डोंगर, तुळजाभवानी डोंगर, गणेश लेणे आणि त्याच्या मागच्या बल्लाळवाडीजवळचा डोंगर आणि शिरोलीजवळचा दुधाऱया या ठिकाणी अनेक समूहांमध्ये या लेणी विखुरल्या गेल्या आहेत. मानमोडीचे नाव तिथे असलेल्या एका शिलालेखात ‘मानमुकुट’ असे येते. या डोंगरात भूत (‘बुद्ध’ या शब्दाचा अपभ्रंश) लेणे, अंबा अंबिका आणि भीमाशंकर असे तीन समूह आहेत. भूत लेण्याच्या चैत्यगृहाचे दान एका यवनाचे आहे असे तेथील शिलालेखावरून समजते. त्या चैत्यगृहावर गजलक्ष्मीचे अतिशय सुंदर शिल्प कोरले आहे. लक्ष्मी म्हणजे पृथ्वी आणि हत्ती म्हणजे ढग. त्यामुळे ढगातून भरपूर पाऊस येऊन पृथ्वीतून धनधान्य येऊन सगळीकडे सुजलाम् सुफलाम् व्हावे अशी भावना मनात ठेवून या देवतेची उपासना सर्वधर्मीय पूर्वी करत असत. त्यामुळे हिंदू, बौद्ध आणि जैन यांच्या वास्तूंवर हे शिल्प अनेकदा पाहायला मिळते.

अंबा अंबिका येथील एका लेखात ‘गिद्धविहार’ असे त्याचे नाव असल्याचा उल्लेख येतो. बिहारमधील राजगीर (प्राचीन राजगृह) येथे जो गृध्रकूट पर्वत आहे, त्याचेच नाव या विहाराला दिल्याने त्या पर्वताचेच जणू काही पावित्र्य या पर्वताला आहे असे सुचवले आहे. या डोंगरातील भीमाशंकर समूहातील एका लेण्यात पश्चिमी शक क्षत्रप राजा नहपान याचा अमात्य वत्सगोत्री अयम याने दान दिल्याचा लेख आहे, पण त्या लेखात नहपानाला महाक्षत्रप म्हटले आहे आणि त्याचे राज्य वर्ष 46 असाही उल्लेख आहे. सातवाहन – क्षत्रप संघर्षातले काही मुद्दे निश्चित होण्यासाठी तसेच कालनिश्चितीसाठी हा लेख अगदी महत्त्वाचा ठरतो. पश्चिमी शक क्षत्रप राजा नहपान याने जेव्हा जुन्नर जिंकले तेव्हा स्वतःला महाक्षत्रप असे म्हणवून घ्यायला सुरुवात केली. तसेच श्री सातकर्णीची या परिसरातील नाणी जशी होती तशीच त्याने पडली. या सर्वांवरून त्या काळातील जुन्नरचे महत्त्व लक्षात येते. नहपान या परिसरात आल्यानंतर इथला परदेशी प्रवाशांचा ओघ वाढला. भडोच येथील दोन लाकडाचे व्यापारी भाऊ बुधमितस आणि बुधरखितस यांनी दिलेल्या दानाचाही लेख इथे आहे. शिवनेरी किल्ला ज्या डोंगरात आहे, त्या डोंगरात बौद्ध लेणींचे चार समूह आहेत. त्यापैकी एकात गावात बांधलेल्या भिक्षुणी विहाराचा उल्लेख आहे. अशा प्रकारचे उल्लेख शिलालेखात फारच क्वचित आढळतात. यावरून जुन्नरच्या परिसरातील डोंगरातच नव्हे, तर खुद्द जुन्नर गावात बांधीव स्थापत्य निर्माण झाले होते असे कळते.

तुळजालेणी या समूहात अजूनपर्यंत एकही शिलालेख सापडला नाही, पण तेथील गोल आकाराचे चैत्यगृह आणि विहारावर असलेले अर्धे पक्षी आणि अर्धे मानव असे दैवी किन्नरांचे चित्रण एकमेवाद्वितीय आहे. चैत्यगृहाच्या रचनेच्या विकासातील हा एक सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. लेण्याद्रीचा गिरिजात्मज या गणपतीमुळे प्रसिद्ध असलेल्या या समूहाचे एक वैशिष्टय़ म्हणजे या समूहातील चैत्यगृहामध्ये स्फिंक्स (सिंहाचे शरीर आणि मानवाचे डोके) या प्राण्याचे स्तंभशीर्ष आहे. हा प्राणी हिंदुस्थानी परंपरेत कुठेही आढळत नाही, पण ज्या स्थळांशी परकीय लोकांचा संबंध आलेला दिसतो तिथे त्याचे शिल्पांकन बऱयाचदा आढळते. नाशिक, कार्ले, जुन्नर या ठिकाणी पण ते आहेच. या डोंगरामागच्या बल्लाळवाडीजवळच्या डोंगरातील अर्धवट कोरलेल्या समूहात एक अतिशय सुंदर नक्षीकाम असलेले चैत्यगृह आणि जवळ एक विहार आहे. चैत्यगृहाच्या सजावटीमध्ये एका वेगळ्याच चिन्हाचा वापर केला आहे. ते आपल्याला हिंदुस्थानात नाशिक येथील चैत्यगृहावर आणि फक्त प्राचीन नाण्यावर दिसते. त्याचे युरोपियन कलेत, विशेषतः त्यांच्या इ.स.पूर्व 4000 या काळातील नवाश्मयुगीन भांडय़ांवर त्याचे चित्रांकन दिसते.
अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचे संदर्भ या गावाच्या आसपासच्या लेण्यांमध्ये दिसून येतात. जसे जुन्नर हे महत्त्वाचे नगर होते तसे चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी आज जे पूर नावाचे अगदी छोटे खेडे आहे, ते प्राचीन काळी बरेच महत्त्व असलेले गाव असणार. तिथे कुकडी नदीच्या उगमावर बांधलेले कुकडेश्वर नावाचे मंदिर आहे. आज जरी ते पडून गेल्यावर त्याची पुनर्रचना केलेली असली तरी पूर्वी ते चांगले देखणे मंदिर होते हे आजही समजू शकते. नगर शैलीतील या मंदिराच्या प्रांगणात महाराष्ट्रातील या परिसरात दुर्मिळ असलेल्या वेताळाची किंवा शिवाचे भूतगणांची शिल्पे आहेत. तसेच महाराष्ट्रात क्वचित आढळणारे नवग्रहसुद्धा गाभाऱयाच्या दरवाजावर कोरलेले दिसतात. या दोन्ही गोष्टी मध्य महाराष्ट्रात असलेल्या मंदिरात दिसत नाहीत. प्राचीन काळी या परिसरात व्यापारी लोक मुक्कामाला राहत असावेत असे वाटते. त्यामुळे याचे नाव पूर आहे असे दिसते.
अशा प्रकारे अतिशय प्राचीन इतिहास असलेले, जीर्ण किंवा जुने असलेले हे जुन्नर महाराष्ट्राच्या एक वैभवशाली काळाची साक्ष देत आजही उभे आहे. या गावात झालेल्या उत्खननातून आजच्या जुन्नरच्या खाली जुने जुन्नर दडलेले आहे हे समजते. काळाच्या ओघात पुणे–नाशिक मार्ग तयार झाल्यामुळे या गावातून व्यापार होणे बंद झाले तरी त्याचे महत्त्व कमी होत नाही.

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत)
n [email protected]

लेण्याद्री
गजलक्ष्मी, भूत लेणी
किन्नर, तुळजा लेणी

आपली प्रतिक्रिया द्या