पाथर्डीत बिबट्याचा बालकावर हल्ला; आजोबांनी वाचवला नातवाचा जीव

leopard

पाथर्डी तालुक्यात बिबट्याचे माणसांवर हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वीच एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता. आता पाथर्डी पाडळी शिवारात एका बालकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटे घडली आहे. या बालकाच्या आजोबांनी दाखविलेल्या धाडसामुळे बिबट्याने पळ काढला आहे. धीरज रामदास गर्जे (वय 9) असे जखमी बालकाचे नाव असून, कारभारी कुंडलिक गर्जे (वय 79) असे आजोबांचे नाव आहे.

कुंडलिक गर्जे आणि त्यांचा नातू धीरज बुधवारी पहाटे प्रातर्विधी उरकून शेतातून घरी येत होते. यावेळी घराच्या जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने धीरजवर हल्ला केला. मात्र, प्रसंगावधान राखत आजोबांनी हातातील काठीने बिबट्यावर जोरदार प्रहार केला. त्यामुळे बिबट्याने पळ काढला. त्याचवेळी रामदास गर्जे व भानुदास गर्जे हे बॅटरी घेऊन धावले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन बिबट्या शेतामधे पसार झाला. बिबट्याच्या हल्ल्यामुळे धीरजच्या डोक्यात, हातावर जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले.

वनविभागाला पाडळी, चितळी, कासारपिपंपळगाव येथे बिबट्या असल्याचे येथील नागरिकांनी वेळोवेळी सांगितले आहे. अफवा पसरवू नका, तो गुन्हा आहे, असे सांगून वनविभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत काढली होती. मात्र, आता बिबट्याने हल्ला केल्याने येथे पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या