
सामना प्रतिनिधी । कवठे येमाई
शिरुर तालुक्यातील कवठे येमाईच्या गांजेवाडी परिसरातील शितोळे वस्तीवर बिबट्याने एका कालवाडीवर हल्ला करीत तिला ठार केले. ही घटना आज बुधवार दि. १९ च्या पहाटे ३ च्या सुमारास घडली आहे. शितोळे वस्तीतीत गांजेवाडी रोड लागत वास्तव्यास असणारे शंकर बन्सी भोर यांच्या घरासमोर बांधलेल्या दिड वर्षाच्या कालवाडीवर मागील बाजूने हल्ला करीत तिला ठार मारले. विशेष म्हणजे शंकरचे आजोबा सावकार भोर हे जेमतेम १० फूट अंतरावर एका खाटेवर झोपलेले होते त्यांना ही घटना सकाळी उठल्यावर लक्षात आली. या परीसरात बिबटे चांगलेच धजावलेले दिसत असून भक्ष्यासाठी मानवी वस्तीत असलेल्या पाळीव प्राण्यांवर सलग दुसऱ्या दिवशी हल्ला करीत त्यांना ठार मारल्याने नागरीक जाम धास्तावले आहेत.
पहाटेच्या सुमारास बिबट्याने या कालवाडीस ठार मारल्याने भोर यांचे यांचे सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे शंकर भोर यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावरील खार ओढ्यावर शाळेवर चाललेल्या एका शिक्षिकेला सकाळी नऊच्या दरम्यान दिवसाच बिबट्याचे दर्शन झाले होते. तर कवठे येमाई परिसरात सध्या बिबटयांची खूपच मोठी दहशत पाहावयास मिळत असून वन विभागाने युद्धपातळीवर त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज डॉ. कुंडलिक शितोळे, दौलत भोर, संपत गायकवाड, विमल भोर व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
घटनेची माहीती मिळताच शिरूरचे वन अधिकारी प्रवीण क्षीरसागर, तालुका पशु वैद्यकीय अधिकारी सातकर यांनी तातडीने घटना स्थळी येऊन मृत कालवड व परिसराची पाहणी केली. शेतवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांनी रात्रीच्या वेळी खबरदारी घेण्याचे आवाहन क्षीरसागर यांनी केले आहे.





























































