कवठे येमाईत बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरूर तालुक्यातील कवठे येमाईत घोडे वस्तीतील मेंढपाळ मोहन अनाजी भाईक यांची एक मेंढी शनिवारी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली.

मोहन अनाजी भाईक हे १०० मेंढरे शेतात चारण्यासाठी घेऊन जात असतांना बिबट्याने मेंढरांच्या कळपातील एक मोठी मेंढी उचलून उसात नेली आणि तीला ठार केले. मेंढपाळ भाईक यांच्या डोळ्यादेखतच हा प्रकार घडला. बिबट्याच्या दर्शनानेच ते अत्यंत घाबरले. तर बाकीची मेंढरे देखील सैरावैरा पळाली. भाईक यांनी या घटनेबाबत फोनवरून माहिती देताच भानुदास रोहिले, शहाजी भाईक, नामदेव भाईक तातडीने तेथे पोहचले. धाडसाने उसात जाऊन त्यांनी मेंढी रस्त्यावर आणली पण तो पर्यंत मेंढी गतप्राण झाली होती. यावेळी माणसांच्या आवाजाने घटना स्थळावरून बिबट्याने पळ काढला. या घटनेबाबत वन विभागाशी संपर्क साधला असता वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी तातडीने भेट देत पंचनामा केला.

बिबट्या पाळीव प्राण्यावर दिवसाही हल्ला करू लागल्याने नागरिकांमध्ये मोठीच भीती निर्माण झाली आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिरूर पंचायत समितीचे सदस्य डॉ. सुभाष पोकळे, सरपंच अरुण मुंजाळ, सुरेखा चाटे, आनंदा चाटे व ग्रामस्थांनी केली आहे. तर शासन नियमानुसार योग्य ती नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्याला नक्कीच दिली जाईल, असे आश्वासन वनाधिकारी सी. ए. काटे यांनी दिले आहे.