बिबट्याचा कोंबड्यांच्या खुराड्यावर हल्ला, 80 कोंबड्यांचा फडशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कवठे यमाई

शिरूरच्या पश्चिम भागात बिबटयांची दहशत कायम असून जांबुत येथील बागायतदार बाळासाहेब हरीभाऊ पठारे यांच्या कुक्कूट पालन केंद्रवर बिबट्याने हल्ला करीत रात्रीत ऐंशी कोंबड्यांचा फडशा पाडल्याने या भागातील बिबट्याच्या दहशतीने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जांबुत, पिंपरखेड परिसरात ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने पाच सहा वर्षापासून या भागात बिबट्याचे वास्तव्य आहे. यापूर्वी या परिसरात बिबट्याने अनेक शेळ्या मेंढ्या तसेच मोठ्या जनावरांवर हल्ला करीत त्यांना ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत. तर बिबट्याने मानवी हल्ले देखिल केले आहे. त्यामुळे या भागात बिबट्याच्या दहशतीमुळे शाळकरी विद्यार्थी, महिला तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी मध्यरात्री बाळासाहेब पठारे यांच्या खुराड्यात बिबट्याने प्रवेश करुन ऐंशी कोंबड्या फस्त केल्या. याची खबर पठारे यांना आज शनिवारी सकाळी लागली त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला, परंतु कोंबड्याना नुकसान भरपाई देण्याची तरतूद शासनस्तरावर नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे पठारे यांनी सांगितले. सबंधित विभागाने या घटनेचा पंचनामा करून पठारे यांना नुकसान भारपाई द्यावी आशी मागणी जांबुत ग्रामस्थांनी केली आहे.