
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील गृहसंकुलामध्ये बिबट्याचा वावर वाढला असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तीन दिवसांपूर्वी एका बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्यामुळे परिसरात तणाव अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे वनविभाग अधिकाऱ्यांनी रहिवाशांसाठी जनजागृती बैठकांचे सत्र सुरू केले असून वसंत विहार परिसरात ‘जागते रहों’ चा नारा देण्यात येत आहे. बिबट्या आलाच तर थाळ्या, डब्बे वाजवा, जोरजोरात आवाज करा किंवा जमल्यास फटाके वाजवा, असा सल्ला वनाधिकारी देत आहेत.
ठाणे शहरालगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असून उद्यानातील वन्यजीव प्राणी अन्नाच्या शोधात गृहसंकुलात येत आहेत. काही वेळा बिबटेदेखील शहराच्या मध्यवर्ती भागात आल्याच्या घटना घडल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी मानपाडा येथील इडन बुड सोसायटीजवळ बिबट्याच्या दिसण्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र कुणी घाबरून न जाता यावर तोडगा म्हणून वनविभागाने रहिवाशांसमवेत बैठका आयोजित केल्या आहेत. बिबट्या आणि वन्यजीवांपासून स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी खबरदारीबाबत मार्गदर्शन बैठकीत करण्यात येत आहे.
गृहसंकुलासभोवताली गवत, झाडे आणि झुडपे नेहमी स्वच्छ ठेवावे, जेणेकरून बिबटे गृहसंकुलाच्या आसपास येण्याचे टाळता येईल.
लहान मुलांना शाळेत जाताना किंवा येताना समूहात पाठवावे आणि रात्री घराबाहेर नेऊ नये.
गृहसंकुलाच्या मोकळ्या जागेत प्रकाश ठेवणे आणि रात्री बाहेर जाण्याच्या वेळेस तीन चार व्यक्तींनी एकत्र जावे.
दगड, काठी फेकणे बिबट्याला धोका
बिबट्याला मारण्याचा प्रयत्न करू नये. आवाज करून बिबट्याला घाबरवता येईल असे करावे. घराबाहेर पडू नये. दगड, काठी, लाकूड फेकणे किंवा बिबट्याला घोका पोहोचवण्याचा प्रयत्न करणे असे गंभीर प्रसंग निर्माण करू शकते. बिबट्या दिसल्यास तत्काळ वनविभागाला कळवावे, असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

























































