
सामना प्रतिनिधी । तीर्थपुरी
जालना जिल्ह्यातील व घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी येथे गुरुवारी रात्री राधेश्याम काळे यांच्या शेतातील आखाड्यावर वासरावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना घडली असतांनाच दुसर्या दिवशी शुक्रवारी रात्री बिबट्याने पुन्हा भास्कर काळे यांच्या आखाड्यावर बांधलेल्या वासरावर हल्ला करून त्याच्या फडशा पडल्याची घटना घडली आहे. बिबट्याने दोन दिवस लागोपाठ दोन आखाड्यावर धुमाकूळ घातल्याने लिंबोनीसह आजूबाजूच्या खडका, पिंपरखेड गावातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान बिबट्याने शिवारात धुमाकूळ माजवला असताना वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन केवळ औपचारिकता पार पाडताना दिसत आहेत. लिंबोनी शिवारात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावणार असल्याचे वनपाल आर.एस. राठोड यांनी सांगितले. सध्या डाव्या कालव्याला पाणी सोडले असल्याने शेतकरी रात्री शेतात जात आहेत. बिबट्याच्या दहशतीने त्यांना शेतात जाता येईना. पाणी असून पाणी देता येत नसल्याने शेतकर्यांना चिंता लागली आहे. वनविभागाने बिबट्याला लवकर जेरबंद करण्याची मागणी शेतकर्यांतून होत आहे.































































