
विहिरीत पडलेल्या दीड वर्षे वयाच्या बिबट्याची रविवारी वनविभागाने सुखरूप सुटका केली. मेहकर तालुक्यातील मोहना खुर्द येथील शंकरराव लाटे यांच्या विहिरीत शनिवारी रात्री बिबट्या पडला होता. रविवारी पहाटे तुषार ताकतोडे विहिरीवर पाणी भरण्यासाठी आला असता त्याला विहिरीत बिबट्या दिसला. ही बातमी गावात पसरली आणि वनविभागाला कळविण्यात आली. उपवनसंरक्षक माळी यांनी सहाय्यक वनसंरक्षक संदीप गवारे, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. आर. तोंडीलायता, वनपाल एस. वाय. बोबडे, क्षेत्रीय अधिकारी एस. डी. परिहार, वनरक्षक के. बी. धनगर, विजय गायकवाड यांचे पथक घटनास्थळी पाठवले. पथकाने बाजीच्या मदतीने बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. बाहेर येताच बिबट्या पळून गेला. रात्री शिकारीच्या मागे धावताना बिबट्या विहिरीत पडला असावा असे सहाय्यक वनसंरक्षक संदीप गवारे यांनी सांगितले.




























































