
शहर परिसरात तसेच तालुक्यात बिबट्यांचा मोठय़ा प्रमाणात वावर वाढला असल्याचे दिसून येत आहे. शहराजवळील सोनेवाडी शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. याच ठिकाणी 17 जून रोजी पहाटेही एक बिबट्या जेरबंद झाला होता. दुसरीकडे कल्याण रोड बायपास चौकातील उड्डाणपुलाजवळ वाहनाच्या धडकेने एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. याशिवाय काळेवाडी (हिवरे झरे) व कापूरवाडी येथेही बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आलेले आहेत. या सर्व घटना पाहता नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
सोनेवाडी गावापासून चासकडे जाणाऱ्या रस्त्यावर भुतारे वस्तीजवळ गेल्या अनेक दिवसांपासून एक मादी बिबट्या व तिच्या बछड्याचा वावर होता. या वस्ती परिसरात साधारण 10 ते 12 घरे आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या पाळीव कोंबड्या, कुत्रे व शेळ्या-मेंढय़ांची दोन्ही बिबट्यांनी अनेकदा शिकार केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शक्ती माळी यांची आई दुपारी घराबाहेर कपडे धूत असताना बिबट्याने त्यांच्यासमोरच कोंबडय़ांवर झडप घातली होती. यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तेथे पिंजरा लावला होता.
15 दिवसांत एकाच ठिकाणी 2 बिबटे जेरबंद
त्यातील एक बिबट्या 17 जून रोजी पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात जेरबंद झाला होता. त्यानंतर पुन्हा दुसरा पिंजरा तेथे लावण्यात आला, त्यात आणखी एक बिबट्या 4 जुलै रोजी जेरबंद झाला आहे. या परिसरात राहणारे शक्ती माळी यांना पिंजऱ्याच्या बाजूने डरकाळी ऐकू आल्यावर त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता बिबट्या जेरबंद झाल्याचे दिसून आले. या बिबट्याने अनेकदा हुलकावणी दिली होती. त्यामुळे पोपट माळी यांनी पिंजऱ्यातच दोन कोंबड्या बांधून ठेवल्या होत्या. त्यांची शिकार करण्याच्या नादात बिबट्या पिंजऱ्यात अडकला. ही माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोंरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नितीन गायकवाड, वनरक्षक सुनील घोत्रे, विजय चेमटे, बाळू रणासिंग, संदीप ठोंबरे, वनसेवक सुभाष हंडोरे तसेच वन्यजीव अभ्यासक हर्षद कटारिया, प्राणीमित्र सचिन क्षीरसागर, यशोदीप गोरे, हेमंत जाधव यांनी पाहणी केली. त्यावेळी नर बिबट्या जेरबंद झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
बायपास रस्त्यावर वाहनाच्याच धडकेत बिबट्याचा मृत्यू
वनविभागाचे पथक सोनेवाडी येथे असतानाच त्यांना बायपास रस्त्यावर एक बिबट्या मृतावस्थेत पडल्याची माहिती मिळाली. पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता अज्ञात वाहनाची धडक बसून त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. मृत बिबट्याला शेंडीजवळील नर्सरीत शवविच्छेदन करण्यासाठी नेले. या बिबट्याचा मृत्यू पहाटेच्या दरम्यान झाल्याची शक्यता वनविभागाच्या पथकाने वर्तविली.
काळेवाडी, कापूरवाडी येथेही बिबट्याचा वावर
नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारात बारेमळा येथील उसाच्या शेतात बिबट्याची 4 पिल्ले आढळून आली होती. मात्र, मादी बिबट्याने रात्रीतून पिल्लांसह स्थलांतर केले होते. त्यानंतर 1 जुलै रोजी पहाटे काळेवाडी (हिवरे झरे) शिवारात बिबट्या दिसला होता. येथे वनपाल शैलेश बडदे, वनरक्षक अशोक नाडेकर, वनसेवक अर्जुन खेडकर तसेच वन्यजीव अभ्यासक हर्षद कटारिया यांनी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे बिबट्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसर पिंजून काढून पिंजरा लावला आहे. कापूरवाडी शिवारातही यापूर्वीच पिंजरा लावण्यात आलेला आहे.
बोल्हेगावच्या सीना पुलाखाली दिसला बिबट्या
अहिल्यानगर शहर परिसरात विशेषतः सीना नदीच्या पट्टय़ात अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. दि. 3 जुलै रोजी भरदुपारी बोल्हेगाव येथील सीना नदीच्या पुलाखाली बिबट्या दिसला होता. तेथे वनविभाग, पोलिसांसह 300 ते 400 लोकांचा जमाव जमला होता. मात्र, काही वेळाने बिबट्याने तेथून पलायन केले. याशिवाय 5 जून रोजी पहाटे बालिकाश्रम रस्त्यावरील लेडकर मळ्यात बिबट्याने शेतकरी अशोक चिपाडे यांच्या गोठय़ात बांधलेल्या गाईवर हल्ला केला होता. तसेच रोहकले मळा, चिपाडे माळा, बोरुडे मळा, कातोरे वस्ती व सीना नदीच्या परिसरात अनेक वेळा बिबट्याचा वावर दिसून आला आहे. याशिवाय वडगाव, जेऊर परिसर, चांदबिबी महाल परिसर या भागात बिबटे कायमच आढळून येतात. वन विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.