
खेड तालुक्यातील बोरज परिसरात बिबट्याने मानवी वस्तीतील गोठ्यात शिरून वासराचा फडशा पडल्याने या परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने वेळीच खबरदारी घेत बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
बोरज घोसाळकरवाडी येथील दीपक घोसाळकर यांच्या मानवी वस्तीतील गोठ्यात शिरून बिबट्याने त्यांच्या जर्सी गायीच्या पाडसाचा फडशा पडला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून बिबट्याने त्याचा फडशा पडल्याने या परिसरात बिबट्याची कमालीची दहशत निर्माण झाली आहे. गेले काही महिने, भोस्ते, निलिक, अलसुरे, मोरवंडे, जांबुर्डे, शिव, आष्टी कोंडिवली या गाव परिसरात बिबट्याचा मुक्त वावर असल्याचे पाहावयास मिळते आहे. रानात शेतीच्या कामानिमित्त गेलेल्या शेतकऱ्यांना अनेकदा बिबट्याचे दर्शन झालेले आहे. मानवी वस्तीनजीक वावर असणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या गावातील ग्रामस्थ वनविभागाकडे करत आहेत, मात्र वनविभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने बिबट्यापासूनचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
काही महिन्यांपूर्वी मोरवंडे-पिंपळवाडी येथील एक शेतकरी महिला आपल्या नातवासह रानात म्हशी आणण्यासाठी गेली असता एका जाळीत तिला बिबट्या बसलेला आढळून आला होता. बिबट्याला पाहताच घाबरलेली ती शेतकरी महिला काट्याकुट्यातून वाट काढत आपल्या नातवासह घरी आली होती. त्या घटनेनंतर रानात शेतीच्या कामासाठी देखील जाणे अशक्य होऊन बसले होते.
दोन महिन्यांपूर्वी मोरवंडे गावच्याच हद्दीत रानात चरण्यासाठी गेलेल्या बैलाचा बिबट्याने बळी घेतला होता. पाळीव जनावरांवर हल्ला होण्याच्या घटना या भागात वारंवार घडत आहेत, मात्र वनविभागाकडून काहीच हालचाल केली जात नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. बोरज घोसाळकर वाडीत गोठ्यात शिरून बिबट्याने वासराचा फडशा पडल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. सध्या बिबट्याच्या भीतीनं रानात शेतीच्या कामासाठीही शेतकरी जाईनासे झाले आहेत. जंगलात वावर असणारा बिबट्या आता बिनधास्तपणे मानवी वस्तीत येऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
































































