
पुणे जिह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरुर परिसरात बिबटयांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या उपाययोजना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या परिसरात 200 पिंजरे तातडीने लावण्यात येणार असून बिबटयांना पकडून त्यांना गुजरातमधील वनतारा किंवा इतर राज्यामध्ये पाठविण्यात येणार आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयात बिबटय़ांच्या हल्ल्या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या निर्णयाची माहिती दिली. नाईक म्हणाले, जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरुर परिसरात बिबटयांची संख्या वाढली आहे. त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी व हल्ल्याच्या घटना घडू नयेत, युद्धपातळीवर या परिसरात वन विभागांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल. केंद्र शासनाच्या परवानगीने या परिसरातील बिबटयांना पकडून त्यांचे स्थलांतर वनतारा, इतर राज्यात किंवा ज्यांना अधिकार आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सोय उपलब्ध आहे, तेथे पाठविण्यात येतील.
वनाशेजारील शेतीला व गोठयांना विद्युत तारांचे पुंपण लावणे, एआयच्या माध्यमातून बिबटयांची हालचालीची माहिती नागरिकांना कळविणे, शेतीला दिवसा पूर्ण ताकदीने वीज पुरवठा करणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना आज देण्यात आल्या आहेत. तसेच या परिसरातील बिबटयांना पकडण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून तातडीने 200 पिंजरे खरेदी करण्यात येतील. त्याशिवाय वन विभागाच्या निधीतून आणखी 1 हजार पिंजरे तातडीने खरेदीसाठी 10 कोटींचा निधी देण्याचे निर्देश देण्यात आले असून आहेत.





























































