मी गर्भवती नाहीये, मला…! वृत्तनिवेदिकेच्या उत्तराने ट्रोलर्स खजील झाले

सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. याचा जसा चांगला वापर आहे, तसाच वाईट वापरही होतो. खासकरून एखाद्या व्यक्तीला वाईट-साईट बोलण्यासाठी त्याला शिवीगाळ करण्यासाठी हे माध्यम हल्ली बरेचदा वापरलं जातं. अनेकदा ज्यांना ट्रोल केलं जातं त्या व्यक्ती भीतीपोटी या ट्रोलर्सना उत्तरं देत नाहीत, तर काहीजण या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करून आपले काम पुढे चालू ठेवतात. ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्तनिवेदिकेने मात्र ट्रोलर्सना असं काही सुनावलं की त्यांना नक्की लाज वाटली असणार. लेस्ली हॉर्टन ही ऑस्ट्रेलियाच्या एका वाहिनीवर वृत्तनिवेदन करते. गेल्या काही दिवसांपासून तिचं वजन वाढत होतं. वाढतं वजन टीव्हीच्या पडद्यावर स्पष्टपणे दिसत असल्याने ट्रोलर्सने तिच्या वाढत्या वजनावरून तिच्यावर टीका करणं सुरू केलं होतं.

लेस्लीकडे वाहतुकीबाबतचे वृत्त देण्याची जबाबदारी असून तिने बातमीपत्रात एका ईमेलबाबत सांगितले. ईमेल लिहिणाऱ्याने म्हटले होते की “प्रेगन्सीबद्दल तुझं अभिनंदन.” लेस्लीने हा मेल वाचून दाखवला आणि म्हटलं की, ‘मी गर्भवती नाहीये, मला गेल्या वर्षी कॅन्सर झाला होता ज्यामुळे माझे गर्भाशय काढून टाकण्यात आले. माझ्या वयाच्या महिला अशाच दिसतात आणि तुम्हाला हे खटकत असेल तर ही वाईट गोष्ट आहे.’ कार्यक्रमाच्या शेवटी लेस्लीने म्हटले की ईमेल करण्यापूर्वी आपण काय बोलतोय याचा विचार करा आणि मग लिहा. लेस्लीने दिलेल्या या उत्तराचे कौतुक होत असून अनेकांनी शरीराच्या ठेवणीवरून मारल्या जाणाऱ्या टोमण्यांविरोधात एकत्रित आवाज उठवण्याचे आवाहन करण्यास सुरूवात केली आहे.

लेस्लीच्या या व्हिडीओवर कॅनडाच्या कॅन्सर संघटनेने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, तू कॅन्सरवर विजय मिळवला आहे. तू या समस्येशी झुंजणाऱ्या असंख्य महिलांसाठी एक चॅम्पियन आहेस. दुसऱ्या एका सोशल मीडिया वापरकर्त्याने म्हटलंय की तू आहेस तशी आम्हाला आवडतेस, तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष कर.