काळसेत भरली बांधावरची शाळा: विद्यार्थ्यांनी घेतले शेती शिक्षणाचे धडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधावरची शाळा या उपक्रमांतर्गत मंगळवारी जि. प. प्राथमिक शाळा काळसे परबवाडा नं. १ च्या विद्यार्थ्यांनी एक दिवस बांधावर घालवून तरवा काढून, लावणी करून प्रत्यक्षरीत्या शेतीचा अनुभव घेतला.

दरम्यान, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख करून दिली. तसेच यावेळी शेती विषयक निबंध स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना लहान वयातच शेतकऱ्यांच्या कष्टाबद्दल जाणीव व्हावी, शेतीबद्दल आस्था निर्माण व्हावी, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेच्या वतीने गेल्या वर्षी पासून हा उपक्रम सुरू केला असुन त्याला शाळा व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

यावेळी काळसे सरपंच केशव सावंत, मुख्याद्यापिका प्राजक्ता कनयाळकर, सहाय्यक शिक्षिका रिया परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सीमा पेंडूरकर, दाजी परब, ग्रामपंचायत कर्मचारी दिनेश काळसेकर, श्रीकृष्ण भाटकर, शेतकरी संतोष परब, सुचिता परब, घाडी, आणि परबवाडा शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

संतोष परब यांच्या शेतात विद्यार्थ्यांनी तरवा काढून प्रत्यक्ष शेतीकामाचा अनुभव घेतला. सरपंच केशव सावंत यांनी बैलांच्या साहाय्याने सुरु असलेल्या नांगरणीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शेती साहित्याची पारंपारिक नावांसहीत ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना प्रश्न विचारून त्यांची मुलाखत घेतली.