अमेरिकेने केलेल्या आर्थिक कोंडीसमोर पर्याय उभा करू

जगात चौथी आर्थिक महासत्ता म्हणून हिंदुस्थानची होणारी वाटचाल रोखण्यासाठीच अमेरिकेने जाणीवपूर्वक हिंदुस्थानी वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ शुल्क लादून आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा कठीण परिस्थितीत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स भारत सरकारच्या पाठीशी ठाम उभा राहील, अशी ग्वाही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, देशासमोरील हे संकट हीच संधी म्हणून व्यापार-उद्योजकांनी इतर देशांतील बाजारपेठांचा पर्याय शोधावा. त्यासाठी भारत सरकारने विविध करसवलतींसह पायाभूत सुविधा द्याव्यात, अशी मागणीही गांधी यांनी केली. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष रमाकांत मालू उपस्थित होते.

ललित गांधी म्हणाले, अमेरिकेने लादलेले हे शुल्क हा तात्पुरत्या स्वरूपात महाराष्ट्रासाठी एक मोठे आव्हान ठरू शकते. पण व्यापारसंबंधाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेवर अवलंबून असल्याची आजपर्यंतची परिस्थिती कमी करण्यासाठी केंद्र सरकारला युरोप,

आफ्रिका, आग्नेय आशियाई देश आणि मध्य पूर्वेकडील देशांसारख्या नवीन बाजारपेठांचा शोध घ्यावा लागेल. आफ्रिका खंडातील लहान लहान देशांमध्ये महाराष्ट्रातील वस्तूंना मोठी मागणी आहे. त्यामुळे निर्यातीसाठी या देशांचा पर्याय उद्योजकांनी निवडणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र चेंबर त्यांना सर्व ते सहकार्य करेल. तसेच युरोप व आफ्रिका खंडांमध्ये भारतीय वस्तूंना प्रचंड मागणी असून, या देशांमध्ये निर्यात करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. तेथे येथील व्यापाऱ्यांसाठी विविध करसवलतींसह आवश्यक पायाभूत सुविधाही पुरविण्याची मागणी यावेळी ललित गांधी यांनी केली.

‘आम्ही भारतीय आहोत, भारतीयच वस्तू वापरणार’
अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50 टक्के शुल्क लावल्याने निर्यातीत होणारी घट भरून काढायची असेल तर भारतीय उत्पादने भारतीय बाजारपेठेतच सर्वाधिक जास्त विकली गेली पाहिजेत. यासाठी ही संधी म्हणून ‘आम्ही भारतीय आहोत, भारतीयच वस्तू वापरणार,’ असे ‘महाराष्ट्र चेंबर’च्या वतीने अभियान सुरू करणार असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले. अमेरिका व चीनच्या वस्तूंना भारतीय बाजारपेठेत पूर्णतः बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कोल्हापुरातून 2 हजार कोटींची अमेरिकेत निर्यात
एकटय़ा कोल्हापूर जिह्यात इंजिनीअरिंग, मशिनरी, वस्त्र्ााsद्योग व कृषी या क्षेत्रांतून अमेरिकेत दोन हजारांहून अधिक कोटी रुपयांच्या वस्तूंची निर्यात केली जाते. सांगली जिह्यातून 1 हजार 500 कोटींहून अधिक वस्तूंची निर्यात केली जाते. आता अमेरिकेच्या या आयात शुल्कामुळे येथील उद्योजकांना आता दुसरा पर्याय शोधण्याची संधी मिळणार असल्याचेही गांधी म्हणाले.