कामगार मिळत नसल्यास कैद्यांना काम द्या, इंग्लंडमधील परिस्थिती सुधारण्यासाठी कायदे सचिवांचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. याचा परिणाम विविध सेवांवर होताना दिसत आहे. पेट्रोलचे टँकर पेट्रोल पंपापर्यंत पोहचवण्यासाठी ट्रक उपलब्ध आहेत, मात्र ते चालवण्यासाठी ड्रायव्हरच नाहीये. अशीच परिस्थिती फळं आणि इतर अन्नधान्य पुरठ्याची आहे. यामुळे इंग्लंडमध्ये इंधनाची आणि इतर काही गरजेच्या गोष्टींची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. पेट्रोल पंपांवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत असून पेट्रोलसाठी लोकांमध्ये हाणामारीही व्हायला लागली आहे.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

इंग्लंडमधील विविध गोष्टींचा आणि सेवांचा पुरवठा पुरेसं मनुष्यबळ नसल्याने बाधित झाला आहे. संपूर्ण इंग्लंडमध्ये जवळपास 10 लाख नोकऱ्या असून त्यासाठी माणसंच सापडत नाहीयेत. यामुळे इंग्लंडचे कायदे सचिव डॉमिनिक राब यांनी कैद्यांना कामाला लावून मनुष्यबळाची ही अडचण दूर केली जावी असा सल्ला दिला आहे. ज्या कैद्यांना दिवसा तुरुंगाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते अथवा ज्या कैद्यांची शिक्षा संपली आहे अशांना नोकऱ्या देऊन ही समस्या सोडवावी असं राब यांनी म्हटलं आहे. नोकरी मिळाल्याने हे कैदी पुन्हा गुन्ह्याकडे वळणार नाहीत असा विश्वासही राब यांना वाटतोय.

फळं किंवा अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांशी इंग्लंडमधले अधिकारी संपर्क साधणार असून त्यांनी अधिकाधिक कैद्यांना नोकरी द्यावी अशी ते गळ घालणार आहेत. इंग्लंडमध्ये 1 लाख ट्रक ड्रायव्हर्सची कमतरता भासत असून ही नोकरी कैद्यांना मिळावी यासाठी इंग्लंड सरकार प्रयत्नशील आहे. कैद्यांकडून समाजसेवा किंवा एका पैशाचाही मोबदला न देता काही कामे करवून घेतली जातात. राब यांनी याकडे लक्ष वेधताना म्हटले की जर देशात मनुष्यबळाची कमतरता असेल तर मग या कैद्यांना उत्पन्न मिळेल अशी कामे द्यायला काय हरकत आहे ? हा प्रस्ताव अंमलात आणल्यास कैद्यांना फायदा होईलच शिवाय देशाची अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल आणि समाजासही त्याचा लाभ मिळेल असा दावा राब यांनी केला आहे. आश्रित, निर्वासितांच्या भवितव्याचा फैसला होईपर्यंत त्यांनाही या नोकऱ्या दिल्या जाव्यात असं राब यांनी म्हटलंय. मात्र हा विषय गृहखात्याशी संबंधित असल्याने याबाबतचा निर्णय त्यांनी घ्यावा असा सल्लाही राब यांनी दिला आहे.