
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा अमानुष चेहरा पुन्हा समोर आला आहे. दहशतवाद्यांनी 12 वर्षाच्या मुलाला ओलीस ठेवले आणि त्याचा खून केला.बांदीपोरा भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांपापासून वाचण्यासाठी गुरुवारी दोघांना ओलीस ठेवले होते. सुरक्षा दलाने स्थानिक लोकांशी चर्चा केल्यानंतर 60 वर्षीय अब्दुल हमीद यांना सोडवण्यात यश अले. परंतु 12 वर्षीय आतिफ मीर हा दहशतवाद्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आणि दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचे होते.
आपल्या मुलाला सोडवण्यासाठी लाऊडस्पीकरवरून आई आणि वडिल दहशतवाद्यांकडे अक्षरशः भीक मागत होते. अगदी देवाची शपथही त्यांनी घातली. मुलाची आई दहशतवाद्यांना म्हणाली की,“आमच्या मुलाला सोडून द्या, तुम्ही आमच्याकडे जेवत होते. आमच्यावर मेहेरबानी करा.” या सगळ्यात त्या मुलाचा काय दोष? असेही या माऊलीने या दहशतवाद्यांना विचारले.
मुलाचे वडिल दहशतवाद्यांना विनवणी करताना म्हणाले की, “माझ्या पोराला सोडून द्या, हा जिहाद नव्हे तर मुर्खपणा आहे. त्याला सोडल्यानंतर तुम्ही जिहाद केला तर ती दुसरी गोष्ट आहे. परंतु तुम्ही देवाचे दूत आहात, तुम्ही आम्हाला अडचणीत आणत आहात तसेच स्वतःलाही अडचणीत आणत आहात.” आई वडिलांनी विनवणी करूनही निर्दयी दहशतवद्यांनी ऐकले नाही आणि त्या लहान मुलाचा जीव घेतला.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी लपले होते. या दहशतवाद्यांनी दोन सामान्य नागरिकांना ओलीस ठेवले होते. संध्याकाळी एकाची सुटका करण्यात दलाला यश आले परंतु मोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. हे दहशतवादी बांदीपोरा जिल्ह्यातील हाजिन भागात चकमकीत ठार झाले. दोन्ही दहशतवाद्यांनी ओळख पटली असून एकाचे नाव अली व दुसर्याचे नाव हुबैब आहे. दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचे समोर आले आहे.


























































