
होळीच्या दिवशी रंग खेळायची इच्छा असते, पण केमिकलयुक्त रंगांची भीती वाटत असते. त्वचेची हानी किंवा डोळ्यांत रंग जाण्याची भीती असते. केमिकलयुक्त रंगांना नैसर्गिक- हर्बल रंग हा एक चांगला पर्याय आहे. भाज्या आणि फुलांपासून रंग बनवून होळीला पर्यावरणपूरक करण्याकडे कल दिसून येत आहे. असे रंग घरच्या घरी तयार करता येतात.
फक्त कोरडे नव्हे, तर ओले नैसर्गिक रंगही घरी बनवता येऊ शकतात. तेही फुलापानांपासून…नैसर्गिक कोरडा रंग बनवण्यासाठी फुले धुऊन उन्हात वाळवायची. त्यानंतर चांगली बारीक करून पावडर बनवायची. यामध्ये चंदन तेलाचे दोन-तीन थेंबही घालता येतात. झेंडू, बहावा पिंवा शेवंती यांच्यापासून पिवळा, गुलमोहरापासून निळा, पळसापासून केशरी, गुलाब, जास्वंदापासून लाल रंग तयार होते. हिरवा रंग कडुलिंब, पुदिना, पालक यापासून तयार होतो.
फुले, भाज्यांपासून बनवा रंग
भाज्या आणि फुलांपासून रंग तयार करण्याचे काम यंदा प्रथमच सावित्रीबाई महिला ग्राम संघ, वाघाडीच्या महिलांनी केले. प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी बीट, गाजर, झेंडूची फुले, पळसाची फुले यांपासून हिरवा, केशरी, गुलाबी आदी रंग बनवले. या पर्यावरणपूरक रंगांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. 30 ते 35 किलो रंगाची विक्री झाल्याची माहिती वाघाडी, तालुका डहाणू येथील रज्जू तुकाराम सातवी यांनी दिली.


























































