
चहा आपल्या संस्कृतीमध्ये परदेशातून आलेला एक प्रकार, जो आज अविभाज्य घटक बनला आहे. इंग्रजांची भेट, सकाळचे तर्पण, अमृततुल्य अशा अनेक प्रकारे लोक त्याकडे पाहतात.
वास्तविक पाहता चहाच्या झाडाची शेती करून त्याच्या पानांपासून बनवलेली भुकटी उकळत्या पाण्यात टाकणे आणि दोन मिनिटे झाकून ठेवणे व त्यात नंतर साखर, दूध नावाला घालून किंवा न घालता पिणे ही इंग्रजांची मूळ पद्धत. याला ‘इंग्लिश टी’ म्हटले जाते. हिंदुस्थानात आल्यावर तिच्यावर स्थानिक संस्कार होत गेले. अनेकविध प्रकारे चहा बनवला जाऊ लागला आणि तो हिंदुस्थानी लोक पिऊ लागले.
मूलतः इंग्लिश टी बनवण्याची पद्धत पाहिली तर आयुर्वेदातील फांट कल्पनेशी मिळतीजुळती पद्धत समोर येते. यात पाणी उकळले जाते, नंतर पदार्थ त्या उकळलेल्या पाण्यात सोडला जातो. किती प्रमाणात गुणधर्म उतरणे अपेक्षित आहे, त्याप्रमाणे किमान दोन मिनिटांपासून ते रात्रभर ठेवण्यापर्यंत वेळ फांट बनवताना ठरवली जाते आणि मग गाळून ते पाणी प्यायले जाते. फांट हा संस्कृत शब्द आहे. याचा उपयोग विविध औषधांबरोबर अनुपान म्हणून वापरण्यासाठी केला जातो. याने औषधांचे गुण वाढवले जातात.
असो.आता चहाकडे येऊ या. चहा ब्रिटिश लोक कसे बनवतात ते तुम्हाला सांगितले. त्याप्रमाणे पाहिले तर चुटकीसरशी ताजेतवाने वाटावे म्हणून चहा उकळलेल्या गरम पाण्यात दोन मिनिटे ठेवून नंतर गाळून कोरा प्यायला तर उत्तम फायदा होतो यात दुमत राहत नाही.
गोड पदार्थ जगभरात सर्वच माणसांना आवडतात. चहा असतो कडू, त्यामुळे त्यात थोडीशी साखर नावाला टाकून कडूपणा कमी करता येतो, केला जातो. त्यातच त्यात थोडे दूध टाकले तर कडूपणा आणि कोरडेपणाही कमी होतो. त्यामुळे साखर, दूध घालून केलेला इंग्लिश टी कसा काम करतो ते समजते.
हिंदुस्थानात मात्र पाणी, चहापत्ती, दूध, साखर हे सर्व एकत्र करून उकळून त्याचा काढा केला जातो. चहा हा चहा किंवा फांट न राहता काढा बनतो आणि तोच आता हिंदुस्थानी जनतेच्या जिभेचा कैवारी बनला आहे. असा बनवलेला काढा हा तरतरी देतो की नाही याचे उत्तर वैयक्तिक सवयीनुसार बदलते, परंतु शरीरावर त्याचे घातक परिणाम होतात.
चहा आणि पाणी जास्त उकळले की, चहाची तत्त्वं मोठय़ा प्रमाणात पाण्यात उतरतात. त्याने कडू चवीचे परिणाम जास्त प्रमाणात शरीरावर होतात. म्हणून चहा जास्त पिणाऱयांना छातीत जळजळ होणे, चहा प्यायल्याशिवाय पोट साफ न होणे असे विविध त्रास होतात.
पचायला गोड असलेले दूध आणि पचनास कडू असलेला चहा एकत्र करून उकळले की, दुधाचे गुणधर्म-पोषण यांचा संपूर्ण नाश होतो. म्हणूनच चहा पिऊन लोकांना आम्लपित्ताचा त्रास सुरू होतो. चहापत्ती आणि दूध एकत्र उकळू नये हे जास्त चांगले. चहा तयार करून तो कपात ओतल्यावर त्यामध्ये वरून गरम दूध मिसळलेले कधीही बरे.साखर हा पदार्थ गोडवा आणण्यासाठी चहात घालण्यापेक्षा चहाचा कडूपणा कमी करण्यासाठी घालावा हे जास्त बरे.सध्या साखरेऐवजी गुळाचा चहा वगैरे प्रकार सुरू झाले आहेत. त्याने काहीही वेगळे साध्य होत नाही हे वाचकांनी समजून घ्यावे. उगाच आरोग्यदायक वगैरे समजून गुळाचा चहा वगैरे सवयी लावू नयेत हेच उत्तम. आयुर्वेदानुसार साखरेपेक्षा गूळ चांगला असे भ्रामक समज बनवून घेऊ नयेत आणि अंगीकारूही नयेत.
■ उन्हाळय़ात गरम चहा पिण्यापेक्षा थंड काळा चहा पिणे बरे. गरम चहाच हवा असेल तर एकावेळी थोडा चहा पिणे, पित्ताच्या काळात म्हणजे सकाळी 11 आणि दुपारी 1, संध्याकाळी 4, रात्री 2 वाजता चहा पिऊ नये.
■ थंडीमध्ये चहा बनवताना त्यात आले, काळी मिरी, दालचिनी, चहाचा मसाला यापैकी जे आवडेल ते घातलेले चालते, पण हे सर्व पदार्थ पाण्यात चहापत्तीबरोबर घालून उकळत बसू नये. आले वापरताना आले कुटून घालण्यापेक्षा कुटून चटणी केलेल्या आल्याला दाबून रस काढावा आणि हा रस तयार काळय़ा चहामध्ये कपात ओतल्यावर वरून थोडासा (5 ते 10 थेंब) मिसळावा.
■ वेलची घालताना पूड करून ती घालावी, अख्खी वेलची घालू नये. काळी मिरी फार जास्त वापरू नये.
■ गवती चहासुद्धा पावसाळय़ात किंवा थंडीत वापरावा. नियमित वापरण्याची ही गोष्ट नाही. उन्हाळय़ात तर मुळीच नाही.
– वैद्य सत्यव्रत नानल
[email protected]

























































