समुद्रात बुडत होते परदेशी जहाज, तटरक्षक दल देवदूतासारखे धावून आले; 9 जणांची सुटका, 15 जण अडकले

केरळच्या कोचीजवळ समुद्राच्या मध्यभागी शनिवारी दुपारी एक परदेशी मालवाहू जहाज बुडू लागले. जहाजावरील क्रू मेंबर्सने हिंदुस्थानी तटरक्षक दलाकडे मदतीची याचना केली. यानंतर तटरक्षक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जहाजावरील 9 जणांची सुटका केली. तर 15 अद्याप जहाजावर अडकले असून, त्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. हे मालवाहू जहाज लिबियाचे असल्याचे कळते.

लिबियाचा ध्वज असलेले हे कंटेनर जहाज 23 मे रोजी विझिंजम बंदरातून निघाले आणि 24 मे रोजी कोची येथे पोहोचणार होते. मात्र 24 मे रोजी दुपारी 1.25 वाजता कोचीच्या नैऋत्येस सुमारे 38 नॉटिकल मैल अंतरावर त्यांचे जहाज समुद्रात बुडू लागल्याने त्यांनी हिंदुस्थानी तटरक्षक दलाकडे तात्काळ मदत मागितली.

हिंदुस्थानी तटरक्षक दलाने तात्काळ बचाव कार्य राबवत जहाजावरील 24 क्रू मेंबर्सपैकी 9 जणांची लाईफबोटद्वारे सुटका केली. तर उर्वरित 15 जणांना वाचवण्यासाठी ऑपरेशन सुरू आहे.