
हरयाणाने सेमीफायनलमध्ये बडोद्याचे आव्हान संपुष्टात आणत एलआयसी चषक दिव्यांग टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली. फायनलमध्ये त्यांना विजेतेपदासाठी दिल्लीशी दोन हात करावे लागतील. पहिल्या सेमी फायनलमध्ये हरयाणाने बडोद्याचा 59 धावांनी पराभव केला. गुलबदिनच्या धडाकेबाज 79 धावांच्या खेळीच्या जोरावर हरयाणाने 20 षटकांत 6 बाद 189 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बडोद्याचा डाव 15.5 षटकांत 130 धावांत संपुष्टात आला. हरयाणाच्या गुरूजानीने 24 धावांत 4 बळी टिपले. बडोद्यातर्फे सलामीवीर नितीन चोस्लाने (45) एकाकी झुंज दिली. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये दिल्लीने केरळचा 53 धावांनी पराभव केला. यश नेगीच्या (61) अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने 20 षटकांत 200 धावांचा डोंगर रचला. त्याला अंशुल (40) आणि राजकुमार (नाबाद 41) यांनी चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल केरळला 7 बाद 155 धावांपर्यंतच मजल मारता आली. केरळच्या एम.टी शैजूने 52 धावांची अर्धशतकी खेळी साकारत एकाकी झुंज दिली. या स्पर्धेत देशभरातून एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत. एल.आय.सी. हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून सीएस इन्फोकॉम, न्यू इंडिया ऍश्युरन्स, महाजेनको, एफपीएच, आयसीआयसीआय हे सह प्रायोजक आहेत. स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे क्रीडा उपसंचालक, जी.टी. हॉस्पिटल, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे सहकार्य लाभले आहे.



























































