एलआयसी ग्राहकांसाठी खूशखबर, दोन वर्षांपूर्वी लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हप्ते न भरल्याने लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी लाईफ इन्श्योरन्स कॉर्पोरेशनने (एलआयसी) ग्राहकांना दिली आहे. ज्या ग्राहकांची पॉलिसी लॅप्स होऊन दोन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे, अशा पॉलिसीधारकांना पुन्हा जुनी पॉलिसी सुरू करता येणार आहे.

एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक विपिन आनंद यांनी सांगितले की, ‘अनेक वेळा आर्थिक परिस्थितीमुळे काही ग्राहक एलआयसीचा हप्ता भरू शकत नाही. त्यामुळे त्यांची पॉलिसी लॅप्स होते. विम्याचे कवच पुन्हा मिळविण्यासाठी नवी पॉलिसी काढण्याऐवजी ग्राहक आता लॅप्स झालेली जुनी पॉलिसी पुन्हा सुरू करू शकतात.’

पॉलिसीचा हप्ता निश्चित काळापर्यंत न भरल्यास ती पॉलिसी लॅप्स होत होती. साधारणपणे पॉलिसीधारकाकडे लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी काही महिन्याचा कालावधी मिळत होता.

इरडा या विमा नियामक यंत्रणेनुसार 1 जानेवारी 2014 मध्ये लागू झालेल्या नियमांनुसार पहिल्यांदाच पॉलिसीचा हप्ता चुकल्यास दोन वर्षे पूर्ण होण्याआधीच लॅप्स पॉलिसी पुन्हा सुरू होत होती. मात्र 1 जानेवारी 2014 नंतर काढलेल्या पॉलिसीचे हप्ते चुकून दोन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला असल्यास ती पॉलिसी पुन्हा सुरू करता येत नव्हती. पण ग्राहकांना जीवन विमाचा अधिकाधिक फायदा होण्यासाठी एलआयसीने इरडाकडून विशेष परवानगी घेत पॉलिसी सुरू करण्याचा काळ वाढवला आहे.

युनिट लिंक नसलेल्या एलआयसी योजनांच्या ज्या ग्राहकांनी 1 जानेवारी 2014 नंतर पॉलिसी खरेदी केली आहे. असे ग्राहक 5 वर्षांपर्यंत तसेच युनिट लिंक असलेले ग्राहक तीन वर्षांपर्यंत लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करू शकतात.