जागतिक महिला दिन विशेष: करिअर आणि कुटुंब; ‘सुपरवूमन’ने असा साधावा समतोल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजच्या वेगवान जगात महिला केवळ उंबरठ्याआड मर्यादित न राहता आकाशाला गवसणी घालत आहेत. मात्र, ऑफिसच्या जबाबदाऱ्या आणि घरचा पसारा सांभाळताना अनेकदा त्यांची दमछाक होते. या धावपळीत स्वतःचे अस्तित्व आणि मानसिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी ‘वर्क-लाईफ बॅलन्स’ कसा साधावा? 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांसाठी खास मंत्र.

गोष्टींचे नियोजन करावे

वेळेचे योग्य नियोजन हे अर्धे युद्ध जिंकल्यासारखे असते. दिवसाची सुरुवात करण्यापूर्वीच कामांची प्राधान्यक्रमानुसार ‘टू-डू लिस्ट’ तयार करा. यामुळे कोणती कामे तातडीची आहेत आणि कोणती नंतर करता येतील, याचा अंदाज येतो आणि शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळता येतो.

घरची जबाबदारी वाटून घ्यावी

सर्वच गोष्टी मी एकटीच करू शकते, या हट्टापायी अनेकदा महिला स्वतःला थकवून घेतात. घराची जबाबदारी ही केवळ तुमची नसून कुटुंबाची आहे. त्यामुळे पती, मुले किंवा घरातील इतर सदस्यांकडे कामाची विभागणी करा. छोटी-मोठी मदत मागण्यात अजिबात संकोच करू नका.

स्पष्टपणे ‘नाही’ म्हणायला शिका

स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त काम अंगावर घेणे हे तणावाचे मुख्य कारण ठरते. मग ते ऑफिसमधील अतिरिक्त काम असो वा नात्यांमधील ओझे; जिथे शक्य नाही तिथे स्पष्टपणे पण नम्रपणे ‘नाही’ म्हणायला शिका. यामुळे तुमची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक स्वास्थ्य टिकते.

आरोग्याशी तडजोड नको

कुटुंबाचे आरोग्य जपताना महिला स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करतात. मात्र, गाडी इंजिनशिवाय धावू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आहार वेळेवर आणि पौष्टिक जेवण घ्या. दिवसातून किमान २० मिनिटे चालणे किंवा योगासने करा. आवडीचे संगीत, वाचन किंवा बागकाम यांसाठी वेळ काढा.

‘डिजिटल डिटॉक्स’चे महत्त्व

ऑफिसचे काम ऑफिसमध्येच सोडा. घरी आल्यावर मोबाईल आणि लॅपटॉपपासून दूर राहून कुटुंबाला ‘क्वालिटी टाईम’ द्या. सुट्टीच्या दिवशी कामाचा विचार बाजूला ठेवून स्वतःला पूर्णपणे ‘रिचार्ज’ करा.