
आशुतोष बापट << [email protected] >>
समुद्रातून जाणाऱ्या जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी निरनिराळ्या आकारांची दीपगृहे बांधतात. उंच मनोरा व त्यावरील टोकाकडील भागावर तेजस्वी दिवा म्हणजे लाइट अशी दीपगृहाची रचना असते. बाहेरच्या भिंतीकरील किशिष्ट पद्धतीचे रंगीत पट्टे, आखीव बांधणी या दीपगृहांच्या वैशिष्टय़पूर्ण रचनांमुळे सागरी पर्यटनात दीपगृहं पाहण्यालाही पर्यटकांची पसंती दिसून येते.
महाराष्ट्राला लाभलेला 750 कि.मी.चा समुद्रकिनारा पर्यटन क्षेत्रात मोलाची भर टाकतो आहे. सागरी पर्यटन हे नव्याने विकसित होऊ लागलेले क्षेत्र पर्यटकांना भुरळ पाडते आहे. महाराष्ट्रात समुद्र म्हटलं की, ओघानेच कोकण हा प्रांत डोळय़ासमोर येतो. सागरी महामार्ग, कोकण रेल्वे, कोकणातल्या सडय़ावर दिसणारी कातळ खोद-चित्रे, सुंदर समुद्रकिनारे आणि तिथे होणारे साहसी खेळ. यामुळे कोकणात पर्यटनाच्या विविध संधी आणि सुविधा निर्माण झालेल्या आहेत. यात अजून एका गोष्टीची भर पडेल ती म्हणजे दीपगृहांचे पर्यटन.
समुद्रातून मार्गक्रमण करणाऱ्या जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी ही दीपगृहे (लाइटहाऊस) बांधली गेली. ही दीपगृहे पर्यटकांच्या दृष्टीने कायम लांबच राहिली. कदाचित पूर्वी काटेकोर नियमांमुळे यांचे दर्शन फक्त लांबूनच होत असेल. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. ही दीपगृहे सर्वसामान्य लोकांना ठराविक वेळेत बघता येतात. अगदी आतमध्ये वरपर्यंत जाऊन पाहता येतात. त्यांचे कामकाज कसे चालते हे तिथे आपल्याला सांगितले जाते. रत्नागिरी हे कोकणातील देखणे गाव आता पर्यटनाच्या नकाशावर हल्ली अगदी ठसठशीतपणे उठून दिसते. रत्नदुर्ग, आजूबाजूचे देखणे समुद्रकिनारे, हापूस आंबा, स्कूबा डायव्हिंग यासारखे साहसी खेळ यासाठी रत्नागिरी प्रसिद्ध होते आहे.
या रत्नागिरी पर्यटनामध्ये इथे असलेले दीपगृह अवश्य पाहिले पाहिजे. इ. स. 1867 साली इंग्रजांनी या दीपगृहाची निर्मिती केली. याची उंची 90 फूट असून त्यावर 12 फुटांचा दिव्याचा प्रकाश पाडणारा मनोरा आहे. संध्याकाळी 4 ते 5 या वेळातच हे दीपगृह सर्वसामान्यांना पाहता येते. प्रवेश फी 10 रुपये आणि कॅमेऱ्यासाठी 20 रुपये आकारले जातात. काळ्या आणि पांढऱ्या आडव्या पट्टय़ांनी रंगवलेला हा मनोरा. याच्यावर जी दिव्याची बत्ती असते तिच्या डोक्यावर केशरी रंगाचीच टोपी असली पाहिजे असे संकेत आहेत. मनोऱ्याची रंगसंगतीसुद्धा ठरलेली असते. काळा, पांढरा आणि केशरी हे रंगच प्रामुख्याने दीपगृहासाठी वापरले जातात. याच रंगांची संगती साधून दीपगृह बांधले जाते. क्वचितप्रसंगी सबंध पांढऱ्या रंगाचे दीपगृह पाहायला मिळते. या रंगांच्या रंगसंगतीवरून त्यांचे ठिकाण दूर समुद्रातूनसुद्धा ओळखले जाते. रात्रीच्या वेळी या दीपगृहातून लांबवर पडणारा प्रकाशाचा झोत फारच आकर्षक दिसतो. त्यासाठी फक्त 150 वॅटचे 2 दिवे काम करतात. परंतु त्यांच्या चारही बाजूंनी लावलेल्या काचपट्टी लोलकामुळे (ग्लास प्रीझम्स) प्रकाशाचा झोत तयार होतो आणि तो 25 ते 30 कि.मी. इतका लांबवर पडतो. रत्नागिरीच्या दीपगृहातून प्रत्येक 10 सेकंदात 2 वेळा याचे आवर्तन होते. ही आवर्तने जागतिक नियमांनुसार ठरलेली असतात. अशा प्रत्येक दीपगृहातून पडणाऱ्या प्रकाशझोताची आवर्तने ठरलेली असतात. समुद्रातून जाणाऱ्या जहाजावरील लोकांकडे या आवर्तनांचा तक्ता असतो. त्यावरून आपण सध्या कुठल्या बंदराच्या जवळून प्रवास करतो आहोत याचे ज्ञान दर्यावर्दी मंडळींना होते.
एकही दिवस सुट्टी न घेता वर्षानुवर्षे ही दीपगृहे कार्यरत असतात. वीजपुरवठा बंद झाला तर डिझेलवर चालणारे जनरेटर्स आणि शिवाय सौरऊर्जेवर चालणाऱ्या बॅटऱ्या अशी सर्व चोख व्यवस्था इथे केलेली असते. गावापासून दूर एका टोकाला असलेल्या आणि सर्वसामान्य माणसांपासून अगदी लांब असलेल्या या दीपगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यथासुद्धा आपल्याला इथे ऐकायला मिळतात. ऊन, वारा, पाऊस कितीही असला तरी दीपगृहाच्या कामकाजात कधीही खंड पडत नाही. रत्नागिरीसोबतच वेंगुर्ला, जयगड इथे असलेली दीपगृहेसुद्धा अशीच देखणी आहेत. त्याचा रंग पांढरा आणि लाल अशा पट्टय़ांचा आहे. त्यावर असलेली टोपी मात्र केशरी रंगाचीच असते.
जीपीएससारख्या अत्याधुनिक संपर्क यंत्रणा जरी आता अस्तित्वात आल्या असल्या तरीसुद्धा आपले पाय जमिनीवर रोवून वर्षानुवर्षे दर्यावर्दी लोकांना दिशा दाखवणाऱ्या दीपगृहाचे पर्यटन आपल्या कोकण भेटीत अवश्य करावे.





























































