
खरीप व रब्बी हंगामात अत्यंत कमी प्रमाणात व असमाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज बुधवारी परंपरागत अढी-गुढी (होईक) कार्यक्रमात वर्तवण्यात आला. पावसाअभावी खरीप व रब्बी हंगामातील शेती उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे तसेच येत्या वर्षात तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज होईकात वर्तवण्यात आला.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने पारनेरचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिराच्या प्रांगणात परंपरेप्रमाणे येत्या वर्षातील पर्जन्यमान व पीक परिस्थितीबाबत अंदाज वर्तवण्यात आला.
अढी-गुढी (होईक)साठी मंदिराच्या प्रांगणात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला अधिक मासासह एकूण 13 मराठी महिन्यांचे 13 तसेच राजा व प्रधान यांचे प्रत्येकी एक असे एकूण 15 आढय़ा (खड्डे) घेण्यात आले. या आढय़ांमध्ये पाणी भरण्यात आले. पाणी जिरल्यानंतर हळद लावलेली ज्वारी वडाच्या पानांत गुंडाळून आडय़ांमध्ये ठेवण्यात आली. त्यावर दगड ठेवण्यात आले. आढय़ा पुन्हा पाण्याने भरण्यात आल्या. बुधवारी सकाळी पोलीस पाटील प्रताप औटी व भैरवनाथ मंदिराचे पुजारी संतोष पुजारी यांनी आढय़ांचे पूजन केले. त्यानंतर मराठी वर्षातील महिन्यांच्या क्रमाने आढय़ांमधील वडाच्या पानात गुंडाळलेली ज्वारी बाहेर काढण्यात आली. अधिक महिना वगळता इतर सर्व आढय़ांमधील वडाची पाने कोरडी निघाली. त्यावरून येत्या वर्षात असमाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. तसेच, येत्या वर्षात रोगराई, महागाईचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
11 ते 24 मेदरम्यान पशू-पक्षांच्या हत्या न करण्याचे आवाहन
कल्याण कृतिका नक्षत्रात पारनेरसह पंचक्रोशीतील वाडय़ांमध्ये पशुहत्या बंदी पाळण्यात येते. या नक्षत्रात पशू-पक्षी हत्या केली, तर दुष्काळाला तोंड द्यावे लागते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. यावर्षी 11 मे ते 24 मे 2023 दरम्यान कल्याण कृतिका नक्षत्र असल्याने पशू-पक्षांची हत्या करू नये, असे आवाहन करण्यात आले.
—