
आधारला पॅनकार्ड लिंक करण्यास केंद्र सरकारने शेवटची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नागरिकांना 31 मार्च 2022 पर्यंत आधार-पॅन लिंक करता येणार आहे. या कालावधीत आधार-पॅन लिंक न केल्यास संबंधिताचे पॅनकार्ड निष्क्रिय (इन ऑपरेटिव्ह) ठरणार आहे.
केंद्र सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत आधार-पॅन लिंक करण्याचे आवाहन केले होते, मात्र आजही अनेकांनी अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. त्याची केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. मात्र सदरची मुदतवाढ अंतिम असल्याचेही स्पष्ट केले आहे. तसेच जे नागरिक आधार-पॅन लिंक न करताच पॅनकार्डचा वापर करतील त्यांना तब्बल दहा हजार रुपये दंड केला जाईल असेही अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
एका मेसेजने आधार-पॅन लिंक कर ता येणार
नागरिकांना केवळ एक मेसेज करून आपले आधार-पॅन लिंक करता येणार आहे. त्यानुसार मोबाईलमध्ये ‘यूआयडीपीएएन स्पेस आधार नंबर स्पेस पॅन नंबर’ हा मेसेज टाइप करून 567678, 56161 या नंबरवर पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतर आयकर विभाग आधार-पॅन लिंकची प्रक्रिया करणार आहे. त्याचबरोबर आयकर विभागाच्या संकेतस्थळावर जाऊनही आधार पॅन-लिंक करता येणार आहे.





























































