Lionel Messi India Tour – लिओनल मेस्सी आला आणि गेला! चाहत्यांचा संताप, खुर्च्या आणि बॉटल्स स्टेडियममध्ये फेकल्या

अर्जेंटिनाचा कर्णधार आणि जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सी हिंदुस्थानात आला आहे. त्याला भेटण्यासाठी आणि पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. आजपासून (13 डिसेंबर 2025) त्याचा हिंदुस्थान दौरा सुरू झाला आहे. तो कोलकातामध्ये दाखल झाला असून विमानतळावर त्याच्या स्वागतासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. तसेच त्याला पाहण्यासाठी सॉल्ट लेक स्टेडियमवरही मोठ्या संख्येने चाहते जमा झाले होते. मात्र, लिओनल मेस्सी स्टेडियममध्ये जास्त वेळ न थांबल्यामुळे संतापलेल्या चाहत्यांनी मिळेल ती वस्तू स्टेडियममध्ये फेकण्यास सुरूवात केली. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विश्वकप विजेता रोड्रिगो डी पॉल आणि मेसीच्या इंटर मियामी संघाचा लुइस सुआरेज हे खेळाडू सुद्धा मेस्सीसोबत हिंदुस्थान दौऱ्यावर आले आहे. कोलकातामध्ये पोहचल्यानंतर लिओनल मेस्सी सर्वप्रथम सॉल्ट लेक स्टेडियमवर चाहत्यांना भेटण्यासाठी पोहोचला. मेस्सीला पाहण्यासाठी चाहते सुद्धा उत्सुक होते. स्टेडियमवर चाहत्यांनी तुडूंब गर्दी केली होती. लिओनल मेस्सी स्टेडिमयवर पोहचताल मोठा जल्लोष करण्यात आला. मात्र, पाचच मिनिटांत मेस्सी स्टेडियममधून निघून गेला. त्यामुळे चाहत्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. खुर्च्या, बॉटल्स मिळेल त्या वस्तू स्टेडियममध्ये फेकण्यात आल्या.

लिओनल मेस्सीच्या एका चाहत्याने ANI शी बोलताना आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, “अत्यंत निराशाजनक इव्हेंट होता. तो फक्त 10 मिनिटांसाठी आला. सर्व नेते आणि मंत्री त्याच्याभोवती जमा झाले. आम्हाला काहीच दिसले नाही. त्याने एकही किक मारली नाही किंवा एकही पेनल्टी शॉट मारला नाही. ते म्हणाले होते की शाहरुख खानलाही आणणार. पण त्यांनी कोणालाच आणले नाही. तो 10 मिनिटांसाठी आला आणि निघून गेला. एवढा पैसा, भावना आणि वेळ वाया गेला. आम्हाला काहीच दिसले नाही.”