शीना बोरा हत्याकांड; 65 साक्षीदारांच्या नावांची यादी विशेष न्यायालयात सादर

शीना बोरा हत्याकांड प्रकरणात वगळण्यात आलेल्या 65 साक्षीदारांच्या नावांची यादी सीबीआयने विशेष न्यायालयात सादर केली आहे. यात शीनाची आई तसेच पीटर मुखर्जीची पहिली पत्नी शबनम सिंग हिचा समावेश आहे. वांद्रे येथे 24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली. शीनाची आई इंद्राणी हिचा चालक शामवर रायला आधी पकडल्यानंतर इंद्राणी हिला 2015 साली पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना यालाही याप्रकरणी अटक केली तर सीबीआयने कटात सहभागी झाल्याबद्दल इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीला अटक केली.

विशेष सीबीआय न्यायालयात सध्या हत्याकांडाचा खटला सुरू आहे. दररोज साक्षीदार तपासले जात आहेत. मार्च महिन्यात सीबीआयने 125 साक्षीदारांची अंतिम यादी विशेष न्यायालयात सादर केली होती. त्यात इंद्राणी आणि तिचा दुसरा पती संजीव खन्ना यांची मुलगी विधी मुखर्जी हिचा समावेश होता. संजीव खन्नादेखील याप्रकरणी सहआरोपी आहे.