Video – युती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cm-devendra-fadnavis

राज्यात विधानसभा निवडणूक युतीत लढली जाणार की नाही, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना वारंवार विचारला जात आहे. या संदर्भात आज कराड येथील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी महत्वाचं आणि मोठं विधान केलं. तसंच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद यांच्यावर जोरदार टीका केली.

साताऱ्याचे खासदार उदयन राजे भोसले यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला असून ते देखील सोमवारी कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. उदयन राजे भोसले यांच्या पक्षप्रवेशावरून अनेक प्रश्न या पत्रकार परिषदेत विचारण्यात आले. त्याला मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तरं दिली.

उदयन महाराज हे मुक्त विद्यापीठ आहे. जिथे शिस्त आहे तिथे ते शिस्तीत राहतात, जिथे जनतेला आवडतं तिथे तसं करतात, असं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. कराड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपत प्रवेश केलेले उदयन राजे भोसले देखील उपस्थित होते.

उदयन राजे भोसले यांच्या पक्षप्रवेशावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार असे बोलले जात होते. मात्र ते उपस्थित नव्हते असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर ‘कुठलेच पंतप्रधान हे राजकीय प्रवेशाला उपस्थित राहत नाही. तो प्रोटोकॉल आहे. त्यांनी स्वत: महाराजांना सांगितलं की तुम्ही माझ्याकडे या. किंवा नाशिकला आहे तेव्हा भेट घेणं शक्य आहे. महाराजांची इच्छा होती की मोदींची भेट घेतांना मी त्यांच्यासोबत असावं. पण माझी महाजनादेश यात्रा असल्यानं मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मानली, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

याच दरम्यान युती संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, ‘आमचा संवाद नीट चाललेला आहे. आमचा संवाद कनक्लुजनला जाईल आणि आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवू‘, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे नेते आणि तुम्ही 370 च्या बाजूने आहेत की विरोधात आहात हे स्पष्ट करा. काँग्रेस 370 च्या बाजूने असेल तर महाराज त्या बाजूने राहू इच्छित नव्हते. म्हणून ते इथे आलेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लोकशाहीचा खून वैगरे नाही तर यांच्या पाया खालची जमीन सरकल्याने पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसकडून टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

पवार साहेब मोठे नेते आहेत. मोठ्या नेत्यांनी विधानं करताना विचार केला पाहिजे की हिंदुस्थानला फायदा होतो आहे की पाकिस्तानला. राहुल गांधी यांचं ही असचं झालं होतं. त्यामुळे अशी विधानं केली जाऊ नये. हिंदुस्थानातील मुस्लीम हे राष्ट्रापती अभिमान राखून आहेत. त्यामुळे पवारांनी असे विधान करून मुस्लीम मते वळवण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही. यावरून राष्ट्रवादी पक्षाची मानसिकता दिसते, असंही मुख्यमंत्री म्हणाले.