नवी मुंबईत लोकलची बसला धडक

11

सामना प्रतिनिधी नवी मुंबई

सानपाडा कारशेडमधून रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असलेल्या लोकलने बसला धडक दिल्याने तीन महिला जखमी झाल्याची घटना आज दुपारी सवातीनच्या सुमारास घडली. सुदैवाने या महिलांचा जीव वाचला असला तरी सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सानपाडा कारशेडजवळूनच रस्ता जात असून तेथे रेल्वेचे फाटकदेखील आहे. त्या ठिकाणी कर्मचारी लाल झेंडा दाखवून गाड्या थांबवतो. आज दुपारी कारशेडमधून लोकल बाहेर पडत असतानाच समोरून परिवहन सेवेची बस येत होती. त्या कर्मचाऱ्याने नेहमीप्रमाणे लाल झेंडा दाखवूनदेखील चालक राहुल गायकर याने बस थांबवली नाही. लोकलच्या मोटरमनने समोरून बस येत असल्याचे पाहून ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकलची बसला धडक बसली.

लोकलची धडक एवढी जबरदस्त होती की बसमधील तीन महिला प्रवासी जखमी झाल्या, तर बसचा पत्रा फाटून मोठे नुकसान झाले. बसमधील इतर प्रवासीही प्रचंड घाबरले असून चालक गायकर याला ताब्यात घेतले आहे. कारशेडमधून निघालेल्या लोकलचा वेग कमी होता म्हणून मोठी दुर्घटना टळली. दरम्यान बसचा चालक हा कंत्राटी कामगार आहे. समोरून लोकल येत असल्याचे पाहूनही त्याने बस थांबवली नाही. हा प्रकार धक्कादायक असून परिवहन सेवेच्या प्रशिक्षण विभागालाच प्रशिक्षणाची गरज असल्याचे परिवहन सदस्य विसाजी लोके यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या