अनधिकृत मिनी पर्ससीन विरोधात मच्छिमार आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

वेंगुर्लेच्या समुद्रात अनधिकृत मिनी पर्ससीन मासेमारी सुरू असल्याचा आरोप करत पारंपरिक मच्छीमारांनी मालवण येथील सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. येत्या दोन दिवसात अनधिकृत मासेमारीवर कारवाई न केल्यास कायदा हातात घेऊ, वेंगुर्लेत आचरा राड्याची पुनरावृत्ती झाल्यास त्यास सर्वस्वी मत्स्यव्यवसाय विभाग जबाबदार राहील असा संतप्त इशारा मच्छीमारांनी दिला.

मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर कायद्याचे उल्लंघन करून अनधिकृत मासेमारीला सुरू आहे. असा आरोप होत आहे. अनधिकृत पर्ससीन मासेमारीने धुमाकूळ घातला असून यामुळे स्थानिक पारंपारिक मच्छीमार संकटात सापडले आहेत. लक्ष वेधूनही मत्स्यव्यवसाय विभागाकडून या अनधिकृत पर्ससीन मासेमारीवर कारवाई होत नसल्याचे सांगत मंगळवारी वेंगुर्ले तालुक्यातील पारंपारिक मच्छीमारांनी मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

यावेळी मच्छीमार नेते छोटू सावजी, रविकिरण तोरसकर, दिलीप घारे, बाबी जोगी, यांच्यासह दत्ताराम रेडकर, सुभाष गिरप, कामालकांत कुबल, हेमंत गिरप, सहदेव गिरप, भाग्यवान गिरप, काशीराम आरावंदेकर, दादा केळुसकर आदी वेंगुर्ले येथील पारंपरिक मच्छीमार तसेच सहाय्यक मत्स्य आयुक्त महाडिक, सतीश खाडे, संतोष देसाई आदी मत्स्य अधिकारी उपस्थित होते.

वेंगुर्ले समुद्रात बंदी कालावधीत अनधिकृत पर्ससीन मच्छीमारांनी हैदोस घातला आहे. पारंपारिक मच्छीमारांच्या जलधी क्षेत्रात दोन वाव पर्यंतच्या समुद्रात येऊन मासळीची लयलूट केली जात आहे. यामुळे पारंपारिक मच्छीमारांच्या पोटावर पाय येत आहे. पर्ससीन वर निर्बंध घातले असतानाही कायदा धाब्यावर बसवून राजरोसपणे मासेमारी केली जात आहे. गेली चार वर्षे याबाबत लक्ष वेधूनही अनधिकृत मासेमारीला जरब बसविण्यात मत्स्य व्यवसाय विभाग अपयशी ठरला आहे. परवाना संपलेल्या पर्ससीन नौकांचे नूतनीकरण करून पुन्हा परवाना मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केले जात आहेत. तसेच रत्नागिरी येथून भंगारात काढलेल्या पर्ससीन नौका सिंधुदुर्गात आणून त्याचे नूतनीकरण करून अशा बोटींसाठीही परवाना मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात येत आहेत. अशा बोटींना परवाना मिळू नये. सर्व पर्ससीन बोटींची तपासणी करून अनधिकृत पर्ससीन मच्छीमारीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी वेंगुर्ले येथील पारंपारिक मच्छीमारांनी केली.

कारवाईचे अधिकार तहसीलदार यांना सहाय्यक मत्स्य आयुक्त श्री. महाडिक यांनी अनधिकृत मच्छीमारी बोटींवर कारवाई करताना त्या कारवाई पुरत्या अवरुद्ध करून ठेवण्याचे व दंडात्मक कारवाई साठी तहसीलदारांकडे प्रतिवेदन सादर करण्याचे अधिकार मत्स्य विभागाला आहेत. मच्छीमारी बोटी व साहित्य जप्तीचे अधिकार आम्हाला नाही. तसेच मनुष्यबळ कमी असल्याने कारवाई करताना मर्यादा येत आहेत. असे सांगत अधिकार वाढवून मिळण्यासाठी तसेच मासेमारी प्रकारानुसार दंडाच्या रक्कमेत वाढ करण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.

शेकडोच्या संख्येने पर्ससीन बोटी
जिल्ह्यात फक्त ४३ पर्ससीन नौकाना परवाना असताना समुद्रात शेकडोच्या संख्येने पर्ससीन बोटी दिसत आहेत. अशा अनधिकृत बोटींवर कारवाई का होत नाही ? मत्स्य विभागाची कोणतीही दहशत नसल्यानेच अनधिकृत मासेमारीला जोर चढला आहे. ठोस कारवाईचे अधिकार नाही असे सांगून मत्स्य विभाग नेहमीच हात वर करत आहे. कारवाई साठी मत्स्य विभागाने पोलीस, कोस्टगार्ड व मच्छीमारांच्या साथीने संयुक्त गस्त घालावी. अनधिकृत मासेमारी करणाऱ्या पर्ससीन बोटी आम्ही दाखवून देऊ तुम्ही कारवाई करा असेही यावेळी मच्छीमारांनी सांगितले.