
सामना ऑनलाईन । मुंबई
सीएसएमटी स्थानकात हार्बरच्या फलाट क्रमांक एकवर बेलापूर लोकलने डेड एंडवर बफरला धडक दिल्याने शुक्रवारी सकाळी खळबळ उडाली.
बेलापूरहून सीएसएमटीला आलेली लोकल स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर शिरत असताना बफरला जाऊन धडकली आणि गोंधळ उडाला. सकाळी 11.25 वाजता घडलेल्या या घटनेने प्रवासी एकमेकांवर पडले. सुदैवाने लोकलचा वेग कमी असल्याने थोडक्यात निभावले. मोटरमनकडून ब्रेकचा प्रेशर लवकर सुटल्याने असे घडल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लोकलच्या डब्यांना हादरा बसला. दुपारच्या वेळी हा प्रकार घडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. बफरला धडकलेली लोकल सानपाडा कारशेडला तातडीने रवाना करण्यात आली. त्यामुळे हार्बरची वाहतूक काही वेळ बाधित झाली.





























































