
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई उपनगरी लोकलचा वेग दर तासाला 110 कि.मी. करण्यासाठी रुळांची कार्यक्षमता वाढविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे रेल्वे बोर्डाचे सदस्य (रोलिंग स्टोक) राजेश अग्रवाल यांनी म्हटले आहे. 64व्या वार्षिक रेल्वे राष्ट्रीय पुरस्कार समारंभ आणि सीएसएमटीच्या हेरिटेज गॅलरीत भरवण्यात आलेल्या रेल्वेच्या विविध योजनांच्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी ते आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
मुंबई उपनगरी लोकलचा वेग सध्या 80 ते 100 कि.मी.पर्यंत आहे. उपनगरीय मार्गावरील नव्या बम्बार्डिअर लोकलची क्षमता दर ताशी 110 कि.मी. आहे. परंतु रुळांची क्षमता तसेच काही ठिकाणी असलेल्या लेखावरील निर्बंधांमुळे लोकलच्या वेगावर मर्यादा येत आहेत. जर लोकलचा वेग वाढला तर लोकलच्या दहा ते वीस टक्के फेऱया वाढवणे शक्य होणार असल्याचे रेल्वे बोर्डाचे सदस्य अग्रवाल यांनी सांगितले.
– इंटरसिटी गाडय़ांचा वेग वाढणार
परदेशातील गाडय़ा ज्याप्रमाणे वेगाने धावत आहेत, त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात ‘ईएमयू’ लोकलचा वेग वाढवण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर प्रादेशिक पातळीवरील ‘मेमू’ ट्रेनचा वेग वाढवण्याची योजना आहे. त्यानंतर मुंबई ते दिल्ली, चेन्नई आणि बडोदा, अहमदाबाद अशा शहरांत वेगाने पोहचण्यासाठी इंटरसिटी गाडय़ांचा वेग वाढवण्याची योजना असून त्यासाठी रुळांची क्षमता वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



























































