लॉकडाऊन हा अंतिम पर्याय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व राज्य सरकारांना सूचना

देशात कोरोनाची दुसरी लाट तुफान बनून आली आहे. आव्हान मोठे आहे; पण धैर्याने या संकटाचा मुकाबला देश करीत आहे. कोरोना नियमांचे पालन करून जनतेने देशाला लॉकडाऊनपासून वाचवावे. राज्यांनीही लॉकडाऊन हा अंतिम पर्याय म्हणून पाहावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबर अर्थचक्र सुरू राहण्याचा प्रयत्न आहे.

जनतेच्या आरोग्याची काळजी घेतानाच अर्थव्यवस्थेचीही काळजी घेऊया, असे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा कहर सुरू आहे. रुग्णसंख्या रोज अडीच लाखांवर जात आहे. देशाच्या अनेक भागात रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाहीत. ऑक्सिजनचा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले.

या संकटकाळात अधिकाधिक लोकांनी पुढे यावं आणि देशवासीयांना मदत करावी. युवकांनी आपल्या सोसायटीमध्ये, परिसरात छोटय़ा छोटय़ा समित्या तयार करून करोना नियमांचं पालन करण्यासाठी मदत करावी. असं केलं तर सरकारांना कर्फ्यू किंवा लॉकडाऊन लावण्याची गरजच पडणार नाही.

कोरोना लढाई

फ्रंटलाईन वर्कर्सनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपला जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचविले होते. आता दुसऱया लाटेत पुन्हा दिवस-रात्र मेहनत घेत आहात. या प्रंटलाईन वर्कर्सचे मी कौतुक करतो.
देशाने कोरोनाविरोधात धैर्याने आतापर्यंत लढाई लढली आहे. याचे श्रेय जनतेला असून, आता पुन्हा सर्वांच्या सहभागाने मात करू.
धैर्य, साहस, शिस्त यामुळे परिस्थिती बदलेल.

नियमावलींची ‘मर्यादा’ पाळा

तरुण मित्रांना माझी विनंती आहे, घरातील लोकांना घराबाहेर पडू देऊ नका. प्रसार माध्यमांनीही लोकांना कोरोना नियमावलींचे पालन करण्याचे आवाहन करावे, असे मोदी म्हणाले. नवरात्रीचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या रामनवमी आहे. त्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांना नमन करून आपण कोरोनाच्या नियमावलींची मर्यादा पाळायला हवी, असेही मोदींनी म्हटले. रमजानच्या पवित्र महिन्याचाही आज सातवा दिवस आहे. रमजानही आपल्याला धैर्य आणि नियमाचे पालन करण्याची शिकवण देतो. आजची परिस्थिती बदलण्यास देश अजिबात कमी पडणार नाही, असेही मोदींनी म्हटले.

आताची स्थिती वेगळी

गेल्या वेळेपेक्षा यावेळची स्थिती खूप वेगळी आहे. पहिल्या लाटेवेळी आपल्याकडे पुरेशा पायाभूत सुविधा नव्हत्या. कोरोना टेस्ट लॅब, पीपीई कीट नव्हते; पण आज आपल्याकडे मोठय़ा प्रमाणावर पीपीई कीट, टेस्टींग लॅब आहेत.
हिंदुस्थानने कोरोनाच्या पहिल्या लाटेतच लस तयार केली. शास्त्रज्ञांनी लस विकसित केली. मेड इन इंडिया लसींचा मोठा फायदा होत आहे. जगातील सर्वात स्वस्त लस हिंदुस्थानकडे आहे.

स्थलांतरीत मजुरांनी जिथे आहेत तिथेच थांबावे. मजुरांना गावी जाण्यापासून राज्यांनी रोखावे. मजूर आणि कामगारांचे लवकरात लवकर लसीकरण करावे.

लसीकरण वेगात

आतापर्यंत 12 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाईल. सरकारी केंद्रांवर मोफत लस मिळणार असून, गरीब आणि मध्यमवर्गीयांनी याचा लाभ घ्यावा.
‘दवाँई भी और कढाईं भी’ हा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे. लस घेतल्यावरही कोरोना नियमांचे पालन करायलाच हवे.

आपली प्रतिक्रिया द्या