
हडपसर मधील गंगानगर येथील बसू उर्फ बसवराज कांबळे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास गंगानगर स्मशानभूमी येथे घडली.
बसू उर्फ बसवराज भीमराव कांबळे (वय 27 वर्षे, रा अष्टविनायक कॉलनी, गंगानगर, फुरसुंगी) याच्या डोक्यात मोठा दगड घालून अज्ञात आरोपींनी निर्घृण खून केला. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईला कामाला सोडण्यासाठी तो आज सकाळी साडेसात वाजता आपल्या घरातून निघाला. आईला कामावरती सोडून पुन्हा परत घराकडे येत असतानाच घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गंगानगर स्मशानभूमी येथील रोडवरच त्याला अज्ञात इसमांनी अडवले. त्याला त्याच्या दुचाकीवरून खाली पडून त्याच्या डोक्यात मोठ्या दगडाने वर्मी घाव घातला व निर्घृण खून केला. बसवराज याच्यावर यापूर्वीही हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
संचारबंदीच्या काळातील हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हा तिसरा खून आहे. ऐन संचारबंदी मध्येच गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्वा मधून फुरसुंगी परिसरात खुनाचे सत्र सुरू आहे. प्रवीण नाईकनवरे, शोएब शेख यानंतर आता बसवराज कांबळे याचा फुरसुंगी परिसरात निर्घृण खून झाला आहे.




























































