
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. तरीसुद्धा जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली वाहनांसह नागरिक बाहेर पडत असल्याने, पोलीसांकडून काही कालावधीसाठी थेट वाहनच जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून जिल्ह्यात तीन हजारांहून अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत असल्याने, जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी आता मोकळ्या जागा शोधाव्या लागत आहेत.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर संचारबंदी व लॉक डाऊनमध्ये कोणीही अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त घराबाहेर फिरू नये, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. तरीही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक नागरिक घराबाहेर फिरत असल्याचे दिसून येत आहेत.त्यामुळे अशा नागरिकांची वाहनेच काही कालावधीसाठी जप्त करण्यासह दंडात्मक आणि गुन्हेही दाखल करण्याची कारवाई पोलिसांकडून होत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत पोलीसांनी सुमारे तीन हजारांहून अधिक वाहन मालकांवर कारवाई केली आहे. शहरात अशा गाड्या ठेवण्यासाठी मुख्यालय मैदान,शहर वाहतूक शाखेचे कार्यालय अपुरे पडू लागल्याने,दसरा चौक परिसरातील जैन बोर्डिंग व चित्रदुर्ग मठ येथे या जप्त केलेल्या गाड्या ठेवण्यात येत आहेत.पोलीस मुख्यालय मैदान येथे 1500, करवीर पोलीस ठाण्याने जप्त करून गुन्हे दाखल केलेली 300 ते 500,शहर वाहतूक शाखा कार्यालय व शेजारील जैन बोर्डिंग येथे मिळून 1200, चित्रदुर्ग मठ येथे 200 अशा तीन हजारांहून अधिक गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
दरम्यान राज्यातील लॉकडाऊन दि.30 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आले आहे.त्यामुळे अशा वाहनधारकांवर कारवाई होतच राहणार आहे. सध्याच्या परिस्थितीत शहरात दररोज किमान 100 ते 200 गाड्या जप्त केल्या जात आहेत.
त्यामुळे दररोजच्या कारवाईत जप्त केलेल्या गाड्या ठेवण्यासाठी अजूनही जागा लागणार असल्याने, यापुढे जप्त करण्यात येणारी वाहने ठेवायची कुठे? हा प्रश्न आता पोलीस प्रशासनासमोर उभा राहिला आहे.




























































