लॉकडाऊनमध्ये सीबीएसई शाळांची विद्यार्थ्यांवर ई-लर्निंगची सक्ती, रोज 6 तास मोबाईल पाहून चिमुकल्यांचे डोळे दिपले

कोरोना विषाणुचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे संपूर्ण देश तणावाखाली असताना सीबीएसई शाळांनी मात्र पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा छळ सुरू केला आहे. 1 एप्रिलपासून या शाळांनी ईलर्निंग सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांंना दिवसातून कमीतकमी पाच ते सहा तास मोबाईल पहावा लागत आहे. जास्त वेळ मोबाईल पाहिल्यानंतर मुलांना दृष्टीदोष होतो की काय या भितीने पालकांना ग्रासले आहे.

लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने पहिलीपासून ते आठवी पर्यंत सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या. शाळांचे सर्व कामही थांबविले. शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्था नागरिकांवर कोणताही ताण येऊ नये यासाठी झटत असताना नवी मुंबईतील सीबीएसई बोर्डाच्या शाळांनी मात्र आता ईलर्निंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांंना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे. या पध्दतीमध्ये शिक्षकांनी शिकविलेल्या धड्यांचे व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर किंवा संगणकावर पाठविले जात आहेत. दररोज सुमारे चार ते पाच लेक्चर घेतले जात आहेत. त्यानंतर विद्याथ्र्यांनी होमवर्कसुध्दा ऑनलाईन पाठवावा लागत आहे. हे सर्व करण्यासाठी विद्यार्थ्यांना पाच ते सहा तास संगणक किंवा मोबाईलच्या स्क्रीनकडे एकटक नजर ठेवावी लागते. पालक आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असतात. मात्र आता मुलांचा स्क्रीन टाईम वाढल्यामुळे पालकांचे टेन्शन वाढले आहे.

खाजसी क्लासेसही ऑनलाईन
सीबीएसई शाळांनी ऑनलाईन ईलर्निंग सुरू केल्यामुळे शहरातील अनेक नामांकित खाजगी क्लासेसही आता मैदानात उतरले आहेत. त्यांनीही आता ऑनलाईन लर्निंग सुरू केले आहे. त्यांचेही दररोज दोन ते तीन लेक्चर होत असल्याने अनेक मुलांच्या स्क्रीन टाईममध्ये मोठी वाढ झाली असून त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या दृष्टीपटलावर होणार आहे.

अभ्यासक्रम पुढील वर्गाचा
सीबीएसई शाळांनी सुरू केलेल्या ऑनलाईन ईलर्निंगमध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांंना पुढील वर्गाचा म्हणजे सहावीचा अभ्यासक्रम शिकविला जात आहे. हा अभ्यासक्रम जूनमध्ये शाळा सुरु झाल्यावरही शिकविला जाऊ शकतो. त्यामुळे आता आणीबाणीच्या प्रसंगात विद्यार्थ्यांना वेठीस धरून त्यांच्या आरोग्याशी खेळण्याची कोणतीही आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांनी अजून पुढील वर्गाची पुस्तकेही मिळालेली नाहीत, त्यामुळे त्यांना अभ्यास करताना अनेक अडचणी येतात, अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या