लॉकडाऊनमध्ये काळेवाडीत जन्मलेल्या वासराचे नाव ठेवले ‘कोविड’, तर मावळमध्ये ठेवले ‘कोरोना’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण जगभर कोरोना नावाच्या विषाणूने धुमाकूळ घातला असून देशातही लॉकडाऊन आहे. याच पार्श्वभूमीवर काळेवाडीतील शेतकरी मच्छिंद्र तापकीर यांनी गाईच्या वासराचे नाव ‘कोविड’ ठेवले आहे. तर, वडगाव मावळ येथील प्रगतशील शेतकरी तुषार वहिले यांच्या गोठ्यातील कपिला गायीने नुकतेच एका खिलार वासराला जन्म दिला असून त्यांनीही वासराचे नाव ‘कोरोना’ ठेवले आहे.

शेतकरी म्हटल्यावर गाय, बैल आणि शेतकऱ्यांचे अतूट नाते आहे. काळेवाडीतील शेतकरी आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्या गोठ्यातील मनु नावाच्या गाईने दोन दिवसांपूर्वी एका गोंडस वासराला जन्म दिला. विशेष म्हणजे त्याच्या जन्मानंतर गाईने या पिल्लाच्या जवळपासही कोणाला फिरकू दिलेले नाही. सध्या जगभर कोविड व कोरोना या नावाचीच चर्चा असल्याने तापकीर यांनीही आपल्या या वासराचे नावदेखील ‘कोविड’ असे ठेवले आहे.

कोरोनामुळे माणूसही माणसापासून दूर झालेला आहे. या लॉकडाऊनच्या दिवसांच्या आणि कोरोनाच्या आठवणी पुढील अनेक वर्षे माणसांच्या मनात राहतील. आमच्या मनु नावाच्या गाईने वासराला जन्म दिल्यानंतर या वासराचे नामकरण काहीतरी वेगळे करण्याचा आमचा मानस होता. त्यामुळे या वासराचे सध्या जगभर चर्चा असलेले ‘कोविड’ असे नामकरण करण्यात आल्याचे तापकीर यांनी सांगितले.

मावळ तालुक्यातील वडगावमावळ येथील प्रगतशील शेतकरी तुषार वसंतराव वहिले यांच्याकडे दोन देशी गायी आहेत. यापैकी कपिला जातीच्या गायीने रविवार (दि .12) एक खिलार जातीच्या वासराला जन्म दिला. वहिले कुटुंबीयांनी या वासराचे नामकरण ‘कोरोना’ असे ठेवले आहे. या कोरोनामुळे अनेक कुटुंब एकत्र आले आहेत. अनेक शेजारी एकत्र आले. पोलीस व डॉक्टर यांचे महत्व जगाला खऱ्या अर्थाने समजले. या कोरोनामुळे अनेक जण दगावले आहेत. भविष्यात लवकरच कोरोनावर मातही होईल. या सर्व चांगल्या वाईट गोष्टींची आठवण राहावी म्हणून या वासराचे नाव ‘कोरोना’ असे ठेवले असल्याचे वहिले यांनी सांगितले.