
आखाची देशातील युद्ध आणि जागतिक तेल संकटामुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, देशात पुन्हा ‘लॉकडाऊन’ लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यासंदर्भात अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. मात्र, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी सोशल मीडियाद्वारे या सर्व अफवांचे खंडन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सरकार लॉकडाऊनचा कोणताही प्रस्ताव विचारात घेतलेला नाही. अशा कठीण प्रसंगी नागरिकांनी शांत राहावे आणि चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवून भीतीचे वातावरण निर्माण करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ हा सध्या चिंतेचा विषय आहे. गेल्या एका महिन्यात तेलाचे दर प्रति बॅरल 70 डॉलरवरून थेट 122 डॉलरवर पोहोचले आहेत. यामुळे जगभरातील अनेक देशांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 30% ते 50% पर्यंत वाढ झाली आहे. युरोप आणि आफ्रिकेतील देशांनाही या दरवाढीचा मोठा फटका बसला आहे, मात्र हिंदुस्थान सरकार आपल्या नागरिकांना या जागतिक अस्थिरतेपासून वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे हरदीप पुरी यांनी सांगितले.
The global situation remains in flux, and we are closely monitoring developments across energy, supply chains, and essential commodities on a real-time basis.
Under the leadership of Hon’ble PM @narendramodi Ji, all necessary steps are being taken to ensure uninterrupted…
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) March 27, 2026
आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किमती वाढल्या असूनही, हिंदुस्थानी तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 24 रुपये आणि डिझेलवर 30 रुपयांचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी सरकारने आपल्या महसुलात मोठी कपात केली आहे. तसेच, देशांतर्गत इंधन पुरवठा कमी पडू नये म्हणून परदेशात इंधन निर्यात करणाऱ्या कंपन्यांवर ‘एक्सपोर्ट टॅक्स’ (निर्यात शुल्क) लावून रसद रोखण्याचे धोरण अवलंबले आहे.
ऊर्जा, पुरवठा साखळी आणि जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहील. जागतिक परिस्थिती अनिश्चित असली तरी, हिंदुस्थान कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. “अफवा पसरवणे हे बेजबाबदारपणाचे वर्तन आहे,” अशा गोष्टींना खतपाणी घालू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. सरकार एकंदरीत सर्वच परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून, भविष्यातही योग्य पावले उचलली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Israel Iran War – होर्मुझच्या वेढ्यातून सुटका! 23 दिवसांनंतर ‘जग वसंत’ जहाज गुजरातमध्ये दाखल


























































