नोकरदारांसाठी बेस्टमध्ये 200 ‘लाल परी’ हजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या लोकलचे दरवाजे सर्वसामान्यांना बंदच असल्याने बेस्टवर सर्व गर्दीचा भार येत असल्याने बेस्टने एसटीची मदत घेतली आहे. आतापर्यंत बेस्टच्या ताफ्यात 200 बसेस दाखल झाल्या आहेत. आता 10 ऑक्टोबरपर्यंत आणखी 800 एसटी बसेस बेस्टला मिळणार आहेत. त्यामुळे नोकरदारवर्गाला काहीसा दिलासा मिळणार आहे.

लॉकडाऊनपासूनच मुंबई लाइफलाइन लोकलची जागा बेस्टने घेतली आहे. सर्वसामान्यांना लोकलमध्ये अजूनही प्रवेश नसल्याने बेस्टमध्ये गर्दी होत आहे. सध्या बेस्टमध्य दररोज 16 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. बेस्टकडे 3,500 बस आहेत; परंतु कोरोनानंतर अनेक कर्मचारी कोरोनाबाधित असल्याने तसेच बऱयाच बसेस जुन्या झाल्याने संपूर्ण क्षमतेने बेस्ट चालविणे कठीण बनले आहे. तसेच भाडेतत्वावरील 1200 बसेसपैकी 460 बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बेस्टमध्ये कोरोना काळात गर्दीचा सामना करावा लागत आहे.

एसटी महामंडळाकडून एक हजार गाड्या

बेस्ट प्रशासन 3300 पर्यंत गाड्या दररोज चालवत असून त्या पुरेशा नसल्याने एसटी महामंडळाकडून एक हजार गाडय़ा भाडय़ाने घेण्यात राज्य सरकारने ठरविले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 200 एसटी दाखल करण्याचा निर्णय झाला होता. आता आणखी 800 बसेसही दाखल करण्याचा निर्णय झाला आहे. बेस्टच्या मार्गावरदेखील एसटी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या मार्गांवर गर्दी आहे, त्या मार्गांवरच एसटी चालविण्याचे नियोजन आहे. सध्या नवी मुंबई ते मानखुर्द, ठाणे ते मुंबई व अन्य लांब पल्ल्याचे बेस्टचे मार्ग असून या मार्गांवर एसटी महामंडळातून दाखल झालेल्या एसटी चालवल्या जात आहेत.