…पुन्हा सहजीवन अनुभवले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुण नलावडे, ज्येष्ठ अभिनेते

कोरोना महामारीतील बंदीच्या काळात कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडलोच नाही. नुकताच पुण्यात चित्रीकरणासाठी गेलो होतो. या काळात मास्क, सॅनिटायजरचा वापर, वाफ घेणे या कृती करून स्वतःची काळजी घेतली. योगासनं नियमित करतो. घरी राहिल्यामुळे मला घरचं खायला मिळालं. नाहीतर इतर वेळी मला बाहेरचं खावं लागतं. व्यायामाकडे जास्त लक्ष केंद्रित केलं. वाफ घेण्याचा खूप फायदा झाला. ऑक्सिजन वाढवण्याकरिता प्राणायम करतो. नाटक, सिनेमा बंद होते त्यामुळे अमेरिकेतील नागरिकांसाठी एक ऑनलाइन कार्यक्रम केला. काही मुलाखती झाल्या. इतर मित्रमंडळीच्या मागणीनुसार गाणं गाऊन दाखव, एखाद शूट करून पाठव असे व्हिडीओ 100 वेळा तरी तयार करून पाठवले.

या काळात लोकं घाबरलेली आहेत आणि आपल्याला घाबरवलं गेलंय असं माझं मत आहे. कोरोना आहे यात वाद नाही, पण तो दाखवला जातोय तितका भीषण नाही जर आपण काळजी घेतली तर असं मला वाटतं. रुग्णांची संख्या वाढतेय याकरिता आपली काळजी आपणच घ्यायची आहे. आपणच आपलं डॉक्टर व्हायचंय. काळजी घेतली तर आपण वाचू शकतो, मात्र बंद ठेवलेल्या डब्याचं झाकण अचानक उघडल्यावर जसं सर्व बाहेर येतं तशी लोकांची अवस्था झालीय. लोकं घराबाहेर फारच उत्सुक आहेत. असं त्यांनी करू नये. कारण चित्रीकरणाला पुण्याला गेलो तेव्हा रस्त्यावर खूपच गर्दी दिसली. जिथे पाळलं जात नाही तिथे वाढताना दिसतंय.

कोरोनामध्ये काही जणांच्या नोकऱया गेल्या. जागतिक महामारीसारख्या संकटात कोणाचीही नोकरी जाता कामा नये यासाठी सरकार काय प्रयत्न करणार आहे हा माझा प्रश्न आहे? यामुळे मानसिक खच्चीकरण होत आहे. आज इतर बऱयाच सामाजिक मुद्दय़ांवर चर्चा होते तर या विषयावर नोकरीच्या विषयावर कोणीच काही बोलत नाही.

माझ्या लग्नाला इतकी वर्षे झाली, इतके महिने पहिल्यांदा मला तिच्याबरोबर राहायला मिळालं. ती काय काम करते घरात हे मला स्वतःला करून कळलं. मी घरातली सगळी कामं करतो. उरलेल्या वेळात फिल्म्स बघतो.

काल आम्ही जाहिरात केली तेव्हाही आम्ही आमची केली. डबा सोबत घेऊन गेलो. जेवढी माणसं आवश्यक आहेत तेवढेच उपस्थित होतो. कित्येक वर्षातला आराम मिळाला. शूटिंग सुरू होतंय. मी काळजी घेणारच.

रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रयत्न करा, घरातलं अन्न खा. गरम पाणी प्या, वाफ घ्या. काहीही होणार नाही याची काळजी घ्या.

वर्तमानपत्र रोज वाचतो…

या काळातली माझ्या आयुष्यातली सुधारणा मी टीव्हीवरच्या बातम्या बघणं बंद केलं. बातम्यांनी भीती वाटते त्यापेक्षा मला पेपर जास्त चांगला वाटतो. कारण त्यामध्ये जिवंतपणा आणि खरेपणा आहे. ही गोष्ट बातम्यांध्ये नाही असे वाटू लागले. कारण फक्त बोंबाबोंब करतात. सिनेमासारखं पार्श्वसंगीत दाखवतात. सगळेजण वर्तमानपत्रच वाचण्याकडेच वळतील. वर्तमानपत्र वाचण्याचा कंटाळा आयुष्यात मला कधीच आला नाही. टीव्ही बघितलेल्या बातम्या मला दुसऱया दिवशी वर्तमानपत्रातच वाचायला आवडतात. कारण त्या खऱया असतात.