पुन्हा थिएटर्समध्ये…! बॉलीवूडप्रमाणे मराठीतले गाजलेले चित्रपट होणार पुन:प्रदर्शित

लॉकडाऊनमध्ये ओटीटीकडे वळलेल्या प्रेक्षकांना पुन्हा थिएटरकडे वळवण्यासाठी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थिएटरमधील सुरक्षिततेबाबत प्रेक्षकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी बॉलीवूडप्रमाणे मराठीतही जुने गाजलेले चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे मुळशी पॅटर्न, चोरीचा मामला, हिरकणी, फत्तेशिकस्त या चित्रपटांची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोठय़ा पडद्यावर अनुभवता येईल.

लॉकडाऊननंतर 5 नोव्हेंबरपासून राज्यातील थिएटर सशर्त पुन्हा सुरू झाले आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीने थिएटरमध्ये तुरळक गर्दी पाहायला मिळते. त्यातच नुकसानीच्या भीतीने बॉलीवूडप्रमाणे मराठी निर्मातेही सध्या नवीन चित्रपट प्रदर्शित करण्याची रिस्क घेत नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांना थिएटरकडे वळवण्याची जबाबदारी आता जुन्या गाजलेल्या मराठी चित्रपटांच्या खांद्यावर असणार आहे. नुकतेच ’हिरकणी’चे पोस्टर शेयर करत दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, ’हिरकणी थिएटरचे बुरूज सर करण्याचं आव्हान पेलायला तयार आहे. चित्रपट पुनःप्रदर्शित होण्याचा मान आजपर्यंत निवडक चित्रपटांनाच मिळाला आहे. त्या पंक्तीत हिरकणी जाऊन बसली आहे.

टीव्हीवर चित्रपट पाहणे आणि थिएटरमध्ये चित्रपट पाहणे यात खूप फरक आहे. जुने गाजलेले चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांमध्ये आवड निर्माण होऊन ते पुन्हा थिएटरकडे वळतील अशी आशा आहे. चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यामागे कमाई हा हेतू नसून प्रेक्षकांना पुन्हा थिएटरकडे वळवणे हा मुख्य हेतू आहे. सध्या मराठी निर्माते आपला नवीन चित्रपट प्रदर्शित करण्याच्या मनःस्थितीत नसले तरी डिसेंबरच्या मध्यानंतर हे चित्र बदलू शकते. – मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, मराठी चित्रपट महामंडळ

आपली प्रतिक्रिया द्या