
हडपसर येथे राहणाऱ्या वधू व वराची लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. मात्र वर व वधूच्या पालकांना लॉकडाऊनमुळे लग्नाला हजर राहणं शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांनाच कन्यादान करण्याची विनंती केली. या दाम्पत्याचे पालक सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले आहेत. मुलाचे वडील सेवानिवृत्त कर्नल व मुलीचे वडील सैन्यदलामधून कर्नल पदावरून निवृत्तीनंतर वैद्यकीय सेवेत आहेत.सध्या नागपूर येथे कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. यामुळे लग्नाला कुटुंबातील कोणीच हजर राहू शकत नव्हते. पुणे पोलिसांना केलेल्या विनंतीला मान देऊन ह़डपसर पोलिसांनी पुढाकार घेऊन लॉकडाऊनमध्ये हा विवाह सोहळा अमनोरा क्लब हाऊस येथे संपन्न झाला. हडपसर पोलिसांनी या वधूचे कन्यादान केले.
नवरदेव आदित्यसिंग बिस्ट हा आयटी इंजिनिअर व नवरी मुलगी नेहा कुशवाह ही डॉक्टर आहे. या दाम्पत्याने हडपसर पोलीस स्टेशनने पालकत्व स्वीकारून दोघांचे लग्न लावून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. या लग्नाला परिमंडळ 5 चे पोलिस उपआयुक्त सुहास बावचे, हडपसर पोलिस स्टेशनचे स.सहाय्यक निरीक्षक प्रसाद लोणारे उपस्थित होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पाटील आणि त्यांची पत्नी अश्विनी पाटील यांनी कन्यादान केले.































































