पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबईची लोकल बंदच!

2110
फाईल फोटो

मुंबईतील लोकल सेवा कधी सुरू होणार याचे उत्तर रेल्वे मंत्रालयाने मंगळवारीही दिले नाही. मंगळवारी सायंकाळी एक परिपत्रक जारी केले आणि त्यात ‘पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वेच्या सर्व नियमित सेवा बंद राहतील… असे म्हटले. पण नेमक्या केव्हापर्यंत गाडय़ा धावणार नाहीत याची तारीखच रेल्वेने जाहीर केली नाही. रेल्वेने तारखेची झंझटच खतम केल्याने रेल्वेने आता प्रवाशांसह सर्वांनाच अनिश्चित काळासाठी अधांतरीत ठेवल्याची प्रतिक्रिया त्यामुळे व्यक्त होत आहे.

सोमवारी पूर्व रेल्वेचे लोकल ट्रेनसह नियमित गाडय़ा 30 सप्टेंबरपर्यंत बंद अशा आशयाचे परिपत्रक सोशल मिडियात फिरल्याने मुंबईपासून पार गावापर्यंत सर्वांची हवा टाईट झाली. आतापर्यंतच्या लॉकडाऊनच्या टप्प्यात मध्य रेल्वे सोडून रेल्वे गाडय़ांसंदर्भात इतर सर्व झोनची परिपत्रके आल्यानंतर मध्य रेल्वेला जाग यायची. त्यामुळे हे पत्र खरेच समजून ब्रेकिंग स्टोऱया झाल्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने धावत पळत आज आम्ही काही परिपत्रक काढलेच नाही स्पेशल ट्रेन चालूच राहतील असे स्पष्ट केले. परंतु स्पेशल ट्रेन चालूच राहणार यात काही नाविन्य नव्हते, प्रवाशांना त्यांची रोजची रोजीरोटी देणाऱया लोकलची बातमी हवी होती. त्याबाबत आज रेल्वेने पुन्हा परिपत्रक काढले तेही प्रवाशांना कोडय़ात टाकणारेच निघाले. यात कोणतीही तारीख जाहीर न करता ‘पुढील सूचना मिळेपर्यंत लोकल बंदच राहतील असे म्हटले होते. एरव्ही लोकल बंद पडतात तेव्हा ‘अगली सूचना मिलने तक, कोई लोकल रवाना नही होगी’ या अनाऊन्समेंटची सवय असणाऱया मुंबईकरांना पुन्हा रेल्वेच्या सरकारी बाबूंनी अशा प्रकारे अधांतरीच ठेवले.

आपली प्रतिक्रिया द्या