सावधान…! वाळवंटी टोळधाड दाराशी; असे करा व्यवस्थापन

2330

वाळवंटी कीड अर्थात टोळधाड राज्यात शिरली असून विदर्भात धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्याच्या अगदी जवळ येऊन ठेपल्याने या भागातील शेतकऱ्यांनी सावध राहून काय उपाययोजना कराव्यात, याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या किटक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, शास्त्रज्ञ डॉ. आनंद बडगुजर यांनी दिली आहे.

टोळधाडीने विदर्भातील अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. फळबागा, पिके यांचस फडशा पाडला जात आहे. त्यामुळे नेमकी टोळधाड आहे तरी काय आणि आपल्या भागात आल्यास काय करावे हे जाणून घेतले आहे.

वाळवंटी टोळ या किडीची पार्श्वभूमी
वाळवंटी टोळ या बहुभक्षी किडीचे शास्त्रीय नाव Schistocerca gregaria हे आहे. वाळवंटी टोळ ही जागतिक व आंतरराष्ट्रीय महत्वाची अत्यंत खादाड व नुकसान करणारी कीड असून ती मोठ्या प्रमाणात पिकाचे व इतर वनस्पती व झाडाझुडपांचे नुकसान करू शकते. ही कीड दोन प्रकारच्या अवस्थेत आढळून येते पहिली अवस्था म्हणजे एकाकी अवस्था जिच्यामध्ये ही कीड एकटी किंवा विरळ असते. अनुकल हवामानात ही कीड समूहाने किंवा थव्यात आढळते आणि या अवस्थेला समूह अवस्था किंवा थव्याची अवस्था असे म्हणतात. थव्याच्या अवस्थेत ही कीड कीड मोठे अंतर भ्रमण करू शकते व मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान करू शकते.

मुंबईत खरोखर टोळधाड आली आहे ? सत्य जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा

वाळवंटी टोळ या किडीचे जीवनचक्र
वाळवंटी टोळ या किडीच्या जीवनचक्रात तीन अवस्था असतात.

अंडी अवस्था
या किडीची प्रौढ मादी १५० ते २०० अंडी ओलसर रेताड  जमिनीत शेंगेसारख्या लांबुळक्या आवरणामध्ये समूहाने घालते. हे शेंगे सारखे आवरण रेती मध्ये १० ते १५ सेंटिमीटर आत असते. जमिनीतील ओलावा, आद्रता व तापमानानुसार अंडी उगवण्याचा कालावधी दहा ते बारा दिवसापासून चार आठवड्यापर्यंत राहू शकतो.

पिल्लं अवस्था
अंडी उबवल्यानंतर  त्यातून या किडीचे पिल्ले बाहेर पडतात. टोळ या किडीच्या एकाकी अवस्थेत पिल्लांच्या पाच अवस्था तर समूह किंवा थवा अवस्थेत पिलांच्या सहा अवस्था असतात. साधारणता ३७ डिग्री सेंटीग्रेड च्या आसपास तापमान असल्यास पिल्ले बावीस दिवसात तर बावीस डिग्री सेंटिग्रेड च्या आसपास कमी तापमान असल्यास या किडीची पिल्ले अवस्था ७० दिवसात पूर्ण होते.

प्रौढ अवस्था
पाचव्या अवस्थेतील या किडीची पिल्ले कात टाकल्यानंतर प्रौढ अवस्थेत प्रवेश करतात. सुरुवातीच्या काळात प्रौढावस्थेत पंख नाजूक असल्यामुळे ते उडू शकत नाहीत परंतु परिपक्व प्रौढावस्थेत ते उडू शकतात हीच अवस्था पिकांना व झाडांना जास्त नुकसानदायक अवस्था असते. ही प्रौढावस्था पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होते परंतु थंड वातावरण असेल तर हे प्रौढ ८ महिन्यापर्यंत तग धरु शकतात. सर्वसाधारणपणे चार आठवड्यात प्रौढ प्रजननक्षम बनतात. नर हे मादी पूर्वी प्रजननासाठी सक्षम होतात. मादी टोळ समागमआनंतर दोन दिवसात अंडी घालतात. एकट्या अवस्थेतील प्रौढ टोळ जास्त अंतर उडू शकत नाही परंतु समूहाच्या किंवा थव्याच्या अवस्थेतील परिपक्क प्रौढ खाद्याच्या व अन्नाच्या शोधात फार मोठे अंतर उडून जाऊ शकतात किंवा भ्रमण करू शकतातत. तरुण व अपरिपक्व अवस्थेतील टोळ या किडीचे प्रौढ गुलाबी रंगाचे व थंड वातावरणात लाल व करड्या रंगाचे असतात. समूह अवस्थेतील किंवा थव्याचा अवस्थेतील वाळवंटी टोळ या किडीचे प्रौढ हे चमकदार व पिवळ्या रंगाचे असतात.

नुकसानीचा प्रकार
वाळवंटी टोळ या या किडीची पिल्ले एकत्र येऊन मोठ्या थव्याने वाटेतील वनस्पती चा फडशा पाडत पुढे सरकतात. सायंकाळ झाल्यावर ही टोळ झाडाझुडुपांमध्ये वास्तव्यास राहते. पूर्ण वाढलेले प्रौढ टोळ अतिशय चपळ खादाड असतात व हे प्रौढ झाडाची हिरवी पाने फुले फांद्या व इतर भागाचा फडशा पडतात व पिकाचे अतोनात नुकसान होते.

असे करा व्यवस्थापन
सर्वसाधारणपणे १०, हजार प्रौढ टोळ प्रती हेक्टर किंवा पाच ते सहा पिल्ले प्रति झुडूप अशाप्रकारे या किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन शेतकरी गरजेनुसार या किडीच्या व्यवस्थापनासाठी खालील उपाय योजना करू शकतात. शेतात टिनाचे डबे, प्लास्टिक बॉटल, वाद्य व इतर साहित्याचा वापर करून मोठी आवाज काढल्यास ही कीड तुमच्या शेतात बसणे टाळेल, शेतात कडूनिंब, धोत्रा इतर तन किंवा पालापाचोळा जाळून धूर व शेकोटीचा वापर केल्यास या धुरामुळे तुमच्या शेतात बसणे टाळेल. या टोळधाडची सवय थव्याने एका दिशेने दौडत जाण्याची असल्यामुळे पुढे येणाऱ्या थव्याच्या वाटेवर ६० सेमी मीटर रुंद व ७५ सेमी  खोल चर खोदून त्यात या पिल्लांना पकडता येते. संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी झाडाझुडपावर टोळ जमा होत असल्यामुळे अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून धूर केल्याने किडीचे व्यवस्थापन मिळते. थव्याच्या स्थितीत पिलांची संख्या जास्त असल्यास पाच टक्के निंबोळी अर्क किंवा निंबोळी तेल ५० मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन गरजेनुसार फवारणी करू शकता. गरजेनुसार आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन क्लोरोपायरीफॉस २०% प्रवाही २४ मिलि अधिक दहा लिटर पाणी किंवा क्लोरोपायरीफॉस ५० टक्के प्रवाही १० मिली अधिक दहा लिटर पाणी प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार व प्रादुर्भावानुसार फवारणी करा. फवारणी करताना लेबल क्लेम प्रमाणे करावी, अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करणे टाळावे, प्रमाण पाळावे व फवारणी करताना सुरक्षा किटचा वापर करावा. हा संदेश संभाव्य वाळवंटी टोळ या किडीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रसारित केला असून गरजेनुसार आवश्यकता असेल तरच योग्य निदान करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निर्देशीत उपाय योजनेचा वापर करावा, असे डॉ. बंटेवाड व डॉ. बडगुजर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या