
सामना ऑनलाईन | नवी दिल्ली
‘इस्लाम धर्मात लग्न हे सात जन्माचं नातं नसून केवळ एक करार आहे. जीवनाच्या शेवटपर्यंत आम्ही यात आनंदी आहोत’, असे एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी लोकसभेत म्हणाले. तिहेरी तलाक विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू असताना यावर ओवैसी यांनी आपली बाजू मांडली.
तिहेरी तलाक विधेयक मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकार गेल्या 2 वर्षांपासून प्रयत्न करत आहे. गुरुवारी लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात आले. यावेळी काँग्रेससह एआयएमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवैसी यांनी याला विरोध केला आहे.
आपली बाजू मांडताना ओवैसी म्हणाले, शिक्षा झाल्यानंतर तुरुंगात असलेला पती आपल्या पत्नीला पैसे कसे काय देणार? सरकारकडून इस्लाममधील लग्न प्रथाच नष्ट करण्यात येत आहे. महिलेला रस्त्यावर आणि तिच्या पतीला तुरुंगात टाकले जात आहे. मुस्लीमांना त्यांच्या सभ्यता आणि शिष्टाचारापासून दूर करण्याचा हा डाव आहे. हे विधेयक संविधानविरोधी असून यामध्ये तिहेरी तलाक हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. न्यायालयाने समलैंगिकतेला गुन्हा नसल्याचं म्हटलंय, मग तिहेरी तलाक गुन्हा कसा? असा प्रश्नही ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.























































