50 कर्जबुडव्यांची नावे सरकार जाहीर का करत नाही? राहुल गांधींचा सवाल

646

देशाच्या तिजोरीला चुना लावलेल्या 50 कर्जबुडव्यांची नावे सरकार जाहीर का करत नाही, असा रोकडा सवाल उपस्थित करीत सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकारला चांगलेच घायाळ केले. यावर ही पापे तुमचीच आहेत, असा पलटवार करत केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र राहुल यांच्या प्रश्नाने सरकारच चांगलेच अडचणीत आले. अखेरीस सरकारने शिताफीने ही नावे लोकसभेत जाहीर करण्याचे टाळले.

लोकसभेत आज प्रश्नोत्तराचा तास संपत असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाच्या तिजोरीला चुना लावणाऱया 50 कर्जबुडव्यांचा प्रश्न उपस्थित केला. ज्या ज्या लोकांनी बँकांना फसवले आहे त्या प्रत्येकाला पकडून मायदेशात आणू, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मात्र मोदी सरकार देशाचा पैसा हडपणाऱया 50 कर्जबुडव्यांची नावे का जाहीर करत नाही, असा सवाल करत या 50 जणांकडून कर्जवसुलीसाठी सरकारने काय प्रयत्न केले, असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना चांगलीच कसरत करावी लागली. हे कर्जबुडवे म्हणजे यूपीए सरकारचेच पाप आहे, असे म्हणत अनुराग यांनी प्रियंका गांधी यांचा उल्लेख न करता काँग्रेसच्या पेंटिंगविक्रीचाही विषय उत्तरात घुसडवला. मात्र कर्जबुडव्यांची नावे सार्वत्रिक करणे शिताफीने टाळले. सरकार नावे जाहीर करायला घाबरत आहे, असे लक्षात येताच काँग्रेस खासदार आक्रमक झाले. त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास काही मिनिटे अगोदरच आटोपून या प्रश्नावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला.

पाच वर्षांत पाच लाख कोटींची वसुली

कर्जवसुलीबाबतच्या या प्रश्नाच्या उत्तरादाखल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आकडेवारी सांगताना पाच वर्षांत पाच लाख कोटींची कर्जवसुली करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या